गॅस गळती :सिडको एन-3,एन-4,एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपणा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित

छत्रपती संभाजीनगर,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जालना रोड वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-4 सिडको या ठिकाणी एच.पी.कंपनीचे गँस  टँकरला अपघात झाला आहे. या गॅस टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे.

या अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती,शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तसेच लोक जमा होत आहेत. सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सिडको एन-3,एन-4,एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे  आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहे. सदरील आदेश दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळ पासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधी पावेतो अंमलात राहिल. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

महावितरणने दाखवली तत्परता, मनपा आयुक्तांनी केले कौतुक

महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना मनपा आयुक्त जी.श्रीकांत. 

छत्रपती संभाजीनगर : गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या विनंतीवरून महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ बाधित भागांचा वीजपुरवठा केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हातभार लावला. याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचा पुष्पहारघालून सत्कार केला.

            गॅस गळतीमुळे मनपाच्या अग्निशमन दलाच्या विनंतीवरून सकाळी 9.30 वाजता महावितरणने बाधित भागांचा वीजपुरवठा बंद केला. त्यात सिडको एन-3, टाऊन सेंटर, एमजीएम परिसरातील काही भाग, कॅनॉट प्लेस, न्यायालय परिसर आदींचा समावेश होता. सायंकाळी 6 वाजता अग्निशमन दलाकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. जालना रोड ते सेव्हन हिल परिसरातील वीजपुरवठाही दुपारी 2 वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता. सर्व वसाहतींत जवळपास 7 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवला गेला.