महावितरणच्या जनमित्रांचा गौरव;लाईनमन दिवस उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च  / प्रतिनिधी :-  ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणतर्फे शनिवारी (4 मार्च) लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद परिमंडल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.

          यावेळी सर्व जनमित्रांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सचिन तालेवार यांनी जनमित्रांना शुभेच्छा संदेश दिला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत जनमित्रांचे प्रबोधन केले. सुरक्षा साहित्याच्या वापरासह काम करताना खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जनमित्रांच्या वतीने किरण भदर्गे, जीवन पवार, वृषाली फाळके, ज्ञानदेव भालेराव, नारायण खरात यांनी मनोगत व्यक्त केले.

सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांनी लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा देऊन जनमित्रांच्या कामाचा गौरव केला.

अध्यक्षीय समारोप करताना औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे म्हणाले की, जनमित्र हा महावितरणचा चेहरा आहे. महावितरणच्या व्यवस्थेमधील तो अत्यंत महत्वाचा घटक आहे. ऊन, वारा, पाऊस व इतर कठीण परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी जनमित्र अहोरात्र परिश्रम करतात. सुरळीत वीजपुरवठ्याबरोबरच कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीजबिल वसुलीच्या कामातही जनमित्रांनी पुढाकार घ्यावा आणि कंपनीला प्रगतिपथावर न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, अतुल देवकर, प्रकाश तौर, सुनील शिंदे यांच्यासह शहर मंडलातील शाखा अभियंते व दोनशेहून अधिक जनमित्र उपस्थित होते.