रामाला मांसाहारी म्हणणं जितेंद्र आव्हाडांना चांगलंच भोवणार!

रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर

आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक

ठाणे ,३ जानेवारी / प्रतिनिधी :- देशभरात सध्या सर्व हिंदूंना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे (Ram mandir inauguration) वेध लागले आहेत. रामाचा वनवास संपावा यासाठी हिंदूंची असलेली प्रतिक्षा आता संपणार आहे. मात्र, या उत्साही वातावरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. प्रभू श्रीराम मांसाहारी आहे, असं वक्तव्य करत त्यांनी रामाचा अपमान केला आहे. या प्रकरणी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून हे वक्तव्य आव्हाडांना चांगलंच भोवणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. घाटकोपरचे आमदार राम कदम आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवणार आहेत. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजप आमदार तुषार भोसले आणि नाशिकचे पुजारीही आक्रमक

भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीदेखील आव्हाडांवर टीका केली आहे. रामायणात शूपर्णखादेखील रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही कंदमुळे आणि फळे खातात. मात्र, आव्हाड प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. तर, नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी हे देखील आज नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महाआरती करत नोंदवला निषेध

ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी महाआरती करत निषेध केला. कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांचा हातात फोटो घेऊन आंदोलन केले. तर, आव्हाड यांच्या विरोधात येत्या २४ तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

 देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोलायला हवं!-रोहित पवार

जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडल पाहिजे.देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

रोहित पवारांनी म्हटले की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज असल्याचे रोहित पवारांनी म्हटले. 

आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी पुढे म्हटले की, देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ आहे. मात्र, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरीक म्हणून माझी भावना असल्याचे रोहित पवारांनी म्हटले.