राज्यसभा निवडणूक अटळ! सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस

मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नसल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता भाजप-शिवसेनेत चुरस वाढली आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवाराने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते पहिली मोजली जातील.