‘एक्सपोसॅट’ मोहिमेचे यशस्वी उड्डाण:नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी

श्रीहरिकोटा : मागील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने इतिहास रचला होता. त्यानंतर आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी मोहिम फत्ते केली आहे. देशभरात नववर्षाचा जल्लोष आणि उत्साह साजरा होत असतानाच इस्रोने देखील आपली नव्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करत जल्लोष साजरा केला.

इस्रोने १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ मिशनचं प्रक्षेपण केलं. यानंतर सुमारे २२ मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे.

हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेईल. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेने बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे, जसं की पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा इत्यादी. हा उपग्रह ६५० किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे.

इस्रोने २०१७ मध्ये हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च ९.५० कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-१ मिशनद्वारे (Aditya L-1 Mission) सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. यामुळे नववर्षात भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल त्यांनी अंतराळ समुदायाचे तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“वर्ष 2024 ची दमदार सुरुवात केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांना धन्यवाद! हे प्रक्षेपण अवकाश क्षेत्रासाठी एक संस्मरणीय बाब असून त्याद्वारे या क्षेत्रात भारताचे प्राबल्य वाढेल. भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे  आणि संपूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इस्रोचे अभिनंदन;के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे केले कौतुक

इस्त्रोच्या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी, अध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.

‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने भारतीयांना एक वैज्ञानिक भेट दिली आहे. चंद्रयान – 3 मोहीम, आदित्य – एल 1, गगनयान 1 या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इस्त्रोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल. ‘एक्सपोसॅट’च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे.  या यशामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इस्त्रोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे, संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इस्त्रोच्या पुढील सर्वच मोहिमांना, प्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.