ममतांच्या राज्यात चाललंय काय? महिलांनीच केले दोन महिलांना विवस्त्र!

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : मणिपूर येथे दोन महिलांना विवस्त्र केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडालेली असताना आता पश्चिम बंगालमधूनही चक्क महिलांनीच दोन महिलांना विवस्त्र केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात काही महिला दोन महिलांना बेदम मारहाण करून विवस्त्र करत असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली आहे. अद्याप पश्चिम बंगाल पोलिसांकडे याबाबतची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालदा येथील पकुहाटमध्ये स्थानिक लोकांनी दोन महिलांना चोरीच्या आरोपाखाली रंगेहात पकडले आणि त्यांना मारहाण करून विवस्त्र करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण करताना महिलाच पुढे असल्याचे दिसून येत आहे. मारहाण होत असतानाच अर्धनग्न अवस्थेतच या महिलांनी तेथून पळ काढला.

मात्र, पश्चिम बंगाल पोलिसांच्या मते, त्यांच्याकडे अशी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतरच या घटनेची माहिती मिळाली असा पोलिसांचा दावा आहे. चोरी करताना पकडलेल्या महिला पळून गेल्याने मारहाण करणाऱ्या महिलांनीही भीतीपोटी तक्रार दिली नाही. परंतु आता सुमोटो गुन्हा दाखल केला जाईल आणि तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वी पश्चिम बंगालमधील हावडा येथूनही अशीच एक घटना समोर आली होती. बंगाल पंचायत निवडणुकीतील एका महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. या महिला उमेदवाराने ८ जुलैला विवस्त्र करुन तिचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

याबाबत संबंधित महिलेने ईमेलद्वारे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी, एका महिलेची तक्रार ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. ८ जुलै रोजी हेमंत रॉय आणि इतरांनी तिला जबरदस्तीने मतदान केंद्राबाहेर नेले, तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परंतु तपासादरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी ८ जुलै रोजी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. तसेच याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणांवरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की राज्यात दोन महिलांना विवस्त्र केले जाते. एका महिला उमेदवारावर अत्याचार केले जातात. परंतु सत्ताधारी तृणमूलने अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही किंवा काँग्रेसनेही कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत.

राजस्थानचे मंत्री राजेंद्र गुडा यांचा उल्लेख करत स्मृती इराणी म्हणाल्या की, मणिपूरपेक्षा राजस्थानमध्ये अधिक महिलांचा छळ होत असल्याचे तुमचे मंत्री स्वतः सांगत आहेत. पण काँग्रेसने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई न करता अशोक गेहलोत यांनी त्या मंत्र्यांनाच बडतर्फ केले. याशिवाय सरकारला मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा हवी होती, पण विरोधकांनी नकार दिल्याने मला आश्चर्य वाटते, असेही इराणी यांनी म्हटले आहे.