विस्तारवादाचे युग संपले, आता हे विकासाचे युग आहे- पंतप्रधान

सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट
Banner
  • भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला
  • सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली
  • शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा अर्थ भारत दुर्बल आहे असा कोणी काढता कामा नये
  • सीमावर्ती भागांतील पायाभूत सुविधांवरील खर्चात तिपटीने वाढ
Banner

नवी दिल्ली, 3 जुलै 2020

आज सकाळी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी लडाखमध्ये निमू येथे भेट दिली. सिंधू नदीकाठी वसलेले निमू, झास्कर पर्वतरांगांनी वेढलेले आहे. पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या उच्चस्तरीय नेतृत्वाची भेट घेतली आणि त्यानंतर लष्कर, वायुदल आणि  ITBP अर्थात भारत-तिबेटी सीमा पोलिसदलाच्या जवानांशी संवाद साधला.

सैनिकांच्या पराक्रमास वंदन

Banner

“आपल्या सैन्यदलांचे धैर्य आणि भारतमातेप्रती त्यांचे समर्पण खरोखर अतुलनीय आहे”, अशा शब्दात पंतप्रधानांनी सैन्यदलाच्या पराक्रमाला आदरपूर्वक वंदन केले. “सैन्य दले खंबीरपणे उभी राहून राष्ट्राचे रक्षण करीत आहेत- असा ठाम विश्वास असल्यानेच भारतीय जनता शांतपणे आपले जीवन जगू शकत आहे.” असेही ते म्हणाले.

‘गेल्या काही आठवड्यांत आपल्या सशस्त्र सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली आहे’, असेही पंतप्रधान म्हणाले.

गलवान खोऱ्यातील बलिदानाचे स्मरण

गलवान खोऱ्यामध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या सर्व वीर सुपुत्रांचे पंतप्रधानांनी अभिमानपूर्वक स्मरण केले. या कारवाईत वीरमरण आलेले सैनिक भारताच्या विविध भागातील सुपुत्र होते आणि भारताच्या शौर्यगाथेचे ज्वलंत उदाहरणच त्यांनी घालून दिले आहे.

“लेह-लडाख असो, कारगिल असो, की सियाचीन हिमनदी, उत्तुंग पर्वतरांगा असोत की नद्यांतून वाहणारे बर्फगार पाणी असो, भारताच्या सैन्यदलांनी प्रत्येक ठिकाणी आपले शौर्य सिद्ध केले आहे. भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांचे तेज आणि दरारा यांचा अनुभव घेतला आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी दोन मातांप्रती आदरभाव व्यक्त केला- भारतमाता आणि भारताची अद्वितीय अशी महान सेवा करणाऱ्या, भारतीय सैन्यदलांतील सर्व शूरवीरांच्या माता.

शांततेसाठीची वचनबद्धता म्हणजे आमचे दौर्बल्य नव्हे

Banner

“शांतता, मैत्री आणि धैर्य ही मूल्ये अनंत काळापासून भारतीय संस्कृतीचाच भाग आहेत”, याविषयी पंतप्रधानांनी आपले विचार विशद केले. शांतता आणि प्रगतीचे वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला भारत सदैव सडेतोड प्रत्युत्तर देत आला आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

“शांतता आणि मैत्रीसाठी भारत वचनबद्ध आहेच, मात्र शांततेसाठीच्या या वचनबद्धतेकडे कोणी भारताची दुर्बलता अशा अर्थाने पाहता कामा नये” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. “आज भारत अधिकाधिक शक्तिशाली होत चालला आहे- मग ते नौदलाचे सामर्थ्य असो, वायुदलाची ताकद असो, अवकाशातील शक्ती असो की लष्कराचे बळ असो. शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सेवांतील सुधारणा यांमुळे आपल्या संरक्षण क्षमता कैक पटींनी उंचावल्या आहेत.” असेही पंतप्रधान म्हणाले.

दोन जागतिक महायुद्धांसह, जगभरच्या सैन्यमोहिमांमध्ये पराक्रम गाजवून शौर्य आणि पात्रता सिद्ध करण्याची परंपरा भारतीय सैनिकांना लाभली आहे, याचेही त्यांनी स्मरण केले.

विकासाचे युग

विस्तारवादाचे युग समाप्त झाले आहे आणि हे विकासाचे युग आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विस्तारवादी मानसिकतेमुळेच मोठी हानी झाली आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. “गेल्या काही वर्षांत, भारतीय सैन्यदलांच्या हितासाठी आणि भारताच्या संरक्षणसिद्धतेत वाढ करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली”, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध होण्याची खबरदारी घेणे, सीमावर्ती भागांतील पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सीमाभागाचा विकास, आणि रस्त्यांच्या जाळ्यात वाढ करणे यांचा समावेश आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांवरील खर्चात तिपटीने वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा तसेच सैन्यदलाच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. सरकारने नुकत्याच केलेल्या काही उपक्रमांचा – जसे CDS अर्थात सैन्यदलाप्रमुख पदाची निर्मिती, भव्य अशा राष्ट्रीय युद्धस्मारकाची उभारणी, अनेक दशकांनंतर OROP म्हणजेच समान पद समान निवृत्तीवेतन योजनेची परिपूर्ती, तसेच सैन्यातील जवानांच्या कुटुंबांच्या कल्याणाची खबरदारी घेणाऱ्या उपाययोजना- याचा यावेळी त्यांनी विशेष उल्लेख केला.

लडाखच्या संस्कृतीला अभिवादन

या संवाद सत्रात पंतप्रधानांनी लडाखच्या संस्कृतीच्या महनीयतेचे तसेच कुषोक बकुला रिम्पोचे यांच्या उदात्त संदेशाचे स्मरण केले. “लडाख ही त्यागाची भूमी आहे आणि या भूमीने आजवर अनेक देशभक्त जन्माला घातले आहेत”, असेही ते म्हणाले.

“धैर्याचा धागा विश्वास आणि करुणेशी जोडणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची अमूल्य शिकवणच साऱ्या भारतीयांचे प्रेरणास्थान आहे”, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *