ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित

छत्रपती संभाजीनगर,२ जानेवारी / प्रतिनिधी :-  ध्वनी प्रदूषण  (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या नियम ५ च्या उपनियम (३) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा तसेच शांतता क्षेत्र वगळून)   ध्वनिची विहित मर्यादा राखून १५ दिवस शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०२४ मध्ये शिथिलता द्यावयाचे १५ दिवस निश्चित करण्यात आले असून या दिवशी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक  वापरास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्गमित केले आहेत.

निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे-

            शिवजंयती सोमवार दि.१९ फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार दि. १४ एप्रिल, श्रीगणेश चतुर्थी शनिवार दि.७ सप्टेंबर, ज्येष्ठागौरी पूजन बुधवार दि.११ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी मंगळवार दि.१७ सप्टेंबर, ईद ए मिलाद  सोमवार दि.१६ सप्टेंबर,अष्टमी शुक्रवार दि.११ ऑक्टोंबर, नवमी शनिवार दि.१२ ऑक्टोंबर, दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार दि.१ नोव्हेंबर, ख्रिसमस बुधवार दि.२५ डिसेंबर, मंगळवार दि.३१ डिसेंबर. या शिवाय  उर्वरित चार दिवस राखीव असून कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सूट दिली जाईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.