संकेत कुलकर्णी  हत्या प्रकरणात संकेत प्रल्हाद जायभायेला जन्मठेप

छत्रपती  संभाजीनगर :-कर्ज चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अतिशय निर्घृण  पध्दतीने संकेत कुलकर्णी याचा कारखाली वारंवार चिरडून खून केल्याप्रकरणी संकेत प्रल्हाद जायभाये याला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा आणि एकुण १२ हजार रूपये दंडाची शिक्षा आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एच. केळुसकर यांनी ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगायच्या आहेत. याच प्रकरणातील अन्य आरोपी विजय नारायण जौक, संकेत संजय मचे आणि उमर अफसर पटेल यांची मात्र संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२३ मार्च २०१८ रोजी भर दुपारी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कामगार चौकामध्ये पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी संकेत जायभाय, संकेत मचे, उमर पटेल व विजय जोैक यांना पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर शासनाने अ‍ॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. त्यात सरकारतर्पेâ २२ साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या प्रकरणी युक्तीवाद करताना हे सिध्द केले की, संकेत कुलकर्णी याचा खून करण्याचा आरोपी संकेत जायभाय याचा उद्देश होता. त्याचा संकेत कुकलर्णी याच्यावर राग होता हे त्याने आपल्या मैत्रिणीशी बोलताना स्पष्ट सांगितलेले आहे. घटना घडल्यानंतर त्याने फोन करुन आपण संकेतला कसे मारले याविषयी माहिती दिली व आपणच हा खून केल्याचा त्यांनी एक्स्ट्रा ज्युडिशीयल कन्फेक्शन (न्यायबाह्य कबुलीजवाब) दिलेला होता. संकेत कुलकर्णी याची कार या घटनेत इन्व्हाल्व आहे कारण याच कारने वारंवार धडक दिल्याचे आरोपी जायभाय याला मान्यच होते व तसे धडकेचे पुरावेही समोर आलेले आहेत. प्रत्यक्ष खूनाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विनय वाघ व शुभम डंख यांनी आपल्या साक्षीतून खून किती क्रुर आणि निर्दयी पध्दतीने केला याबाबत साक्ष दिली. सकेत जायभाय याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या विजय वाघ आणि शुभम डंख यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचेही पुराव्यानिशी अ‍ॅड्. निकम यांनी सिध्द केले. हा खून म्हणजे कर्ज चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल, असा अतिशय भयानक आहे. या चित्रपटातील नायकाचा खलनायक कार अंगावर घालून हत्या करतो असाच प्रकार येथे घडला असल्याचा असा युक्तिवाद अ‍ॅड्. निकम यांनी केला होता.
आरोपी उमर पटेल आणि संकेत मचे यांच्यावतीने अ‍ॅड. निलेश घाणेकर यांनी युक्तीवाद केला की, फिर्यादी विनय वाघ यांनी प्रथम दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये उमर पटेल आणि संकेत मचे यांचा उल्लेख केलेला नाही. दहा दिवसांनी घेतलेल्या पुरवणी जबाबात त्यांना गोवण्यात आले. ज्या दिवशी विनय वाघ यांचा पुरवणी जवाब घेण्यात आला त्या दिवशी त्याचे कपडे व मोपेड गाडी जप्त करण्यात आली. त्याबाबतची नोंद स्पेशल डायरीला दहा दिवसाच्या नंतरची आहे. त्यामुळे उमर आणि संकेत मचे हे जायभाय याच्या गाडीत नव्हते हे दिसून येते. घटनेच्या पूर्वी किंवा नंतरही उमर आणि मचे हे जायभायच्या संपर्कात नव्हते. त्यांचा या कटात सहभाग नव्हता हे सिध्द होते. त्यामुळे त्यांचा संकेतला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता असे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले होते. जेव्हा आरोपीने गाडी मागे घेतली तेंव्हा त्याच्या गाडीच्या धडकेने संकेत मचे याचा पाय प्रâॅक्चर झाला. त्याला उमर आणि विजय जौक हे गाडे हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. मोबाईल लोकेशनही उमर आणि संकेत यांच्या बाजुचे आहेत.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड्. उज्वल निकम यांना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड्. अविनाश देशपांडे, पोलीस आयुक्तालयातील विधी अधिकारी अ‍ॅड्. सिद्धार्थ वाघ यांनी विशेष सहकार्य केले. आरोपी संकेत जायभाय याच्या वतीने अ‍ॅड्. राजेश काळे, आरोपी विजय जौक याच्या वतीने अ‍ॅड. बी. एस. भाले तर आरोपी संकेत मचे आणि उमर पटेल यांच्या वतीने अ‍ॅड्. निलेश घानेकर यांनी काम पाहिले. घानेकर यांना अ‍ॅड्. एम. बी. दळवी, अ‍ॅड्. वर्षा घानेकर (वाघचौरे) व अ‍ॅड्. कुलदीप कहाळेकर यांनी सहकार्य केले.तपासी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रमोरे, पोउपनि हारून शेख,  विशेष पैरवी अधिकारी म्हणून सपोनि विकास ढोकरे, सपोनि विठ्ठल चासकर,पोना जनार्दन निकम , पोह वामन गावंडे यांनी काम पाहिले