फक्त रामभक्तांनाच निमंत्रण; राम मंदिराच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नाही! 

राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला 

अयोध्या,१ जानेवारी / प्रतिनिधी :-नववर्षाच्या आगमनासोबतच पहिल्याच महिन्यात अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे, ही संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेली कित्येक वर्षे राम मंदिराची वाट पाहणाऱ्या हिंदूंची प्रतिक्षा यानिमित्ताने संपणार आहे. जे इतक्या वर्षात कोणालाच जमलं नाही, ते भाजप सरकारने करुन दाखवलं, यामुळे सर्व भारतवासी पंतप्रधान नरेद्र मोदींवर प्रचंड खूश आहेत.

विरोधक मात्र या गोष्टीचंही राजकारण करत आहेत. राम मंदिर ही भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, अशी खालच्या पातळीची टीका देखील उबाठा गटाकडून करण्यात आली. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत तर सातत्याने राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी दंगली होणार, अशी बेताल वक्तव्ये करत असतात. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राम मंदिर उभारणीत अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे, ज्यांच्या पुढाकारामुळे आज अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, त्यांच्या मुलाने वारंवार या मंदिराला हिणवणं आणि या गोष्टीचं राजकारण करणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना अनेकदा सुनावलं आहे. मात्र, तरीही त्यांच्या टीका कमी होत नाहीत. त्यातच उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही, हा एक चर्चेचा विषय ठरला. विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना या सोहळ्याचं आमंत्रण येऊनही उद्धव ठाकरेंना आमंत्रण न मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र, आता खुद्द राम मंदिराचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सत्येंद्र दास म्हणाले, जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असं म्हणणं अत्यंच चुकीचं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवलं आहे. हे काही राजकारण नाही. ही भक्ती आहे, असं म्हणत सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. पण, हे वक्तव्य किती हस्यास्पद आहे. संजय राऊत यांना इतका त्रास होतो आहे की त्यांना तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. हे तेच लोक आहेत जे रामाच्या नावावर मतं मागत होते. आता हे बकवास करत आहेत. तसंच प्रभू रामचंद्रांचा अपमान करत आहेत असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना फटकारले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही व आता ते मिळण्याची शक्यताही फार कमी आहे.