नगरपंचायत निवडणूक :महाविकास आघाडीची बाजी ,पण सर्वाधिक जागा भाजपाला

मुंबई ,१९ जानेवारी / प्रतिनिधी :- संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाने २४ नगरपंचायती जिंकल्या असून सर्वाधिक ३८४ जागा मिळवल्या आहेत. २०१७ मध्ये भाजपाकडे नगरपंचायतीत ३४४ सदस्य होतेसध्याच्या निकालाबद्दल बोलायचं गेल्यास भाजपा (३८४ ) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांक आहे. मात्र २०१७ च्या निकालाशी तुलना केली तर भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरत असून राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांवर फेकला गेला. भाजपाने सर्वाधिक नगरपंचायती जिंकतानाच सदस्य संख्येतही पहिला क्रमांक मिळवला आहे.

महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असूनही शिवसेना मात्र पिछाडीवर राहिली आहे. शिवसेनेने १४ नगरपंचायतींमध्ये विजय मिळवला असून २८४ जागा मिळवल्या आहेत. २०१७ मध्ये शिवसेनेची सदस्यसंख्या २०१ होती. त्या तुलनेत शिवसेनेला यावेळी चांगलं यश मिळालं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने २५ नगरपंचायती आणि ३४४ जागा जिंकल्या आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३३० सदस्य होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या मतांमध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे. सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. २०१७ मध्ये ४२६ सदस्यसंख्या असणारी काँग्रेस ३१६ वर पोहोचली आहे. काँग्रेसने १८ नगरपंचायती जिंकल्या आहेत.

पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध :-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Displaying LIV_6893.JPG

राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल.

त्यांनी सांगितले की, गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे.

ते म्हणाले की, सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली.

राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

‘मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

तसंच ‘कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे’, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपला जनतेने नाकारले आहे हे निकालातून स्पष्ट होते – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या उदयोन्मुख नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात मेहनत घेतली. गेले दोन-अडीच वर्ष मतदारसंघाकडे ते लक्ष देत आहेत. आमच्याकडे नवीन नेतृत्व निर्माण झाले आणि त्यांनी यश संपादित केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी नगर पंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत दिली. काही अनुभवी नेत्यांना त्यांच्या भागामध्ये यश मिळालेले नाही. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्याची कारणे शोधली पाहिजेत. पण लक्षपूर्वक काम केल्यास जनता राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारत आहे, हे स्पष्ट होते, असे नवाब मलिक म्हणाले. थेट लढत झाली तिथेही भाजपला बीड जिल्ह्यात चार पैकी तीन जागा मिळाल्या. मराठवाडा, कोकण, विदर्भ पाहिला तर भाजपला कुठेही यश मिळालेले नाही. स्वबळावर बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत. मत विभाजन होत असताना भाजपला यश मिळत नाही. याचा अर्थ हा आहे की मागील निवडणुकांच्यावेळी भाजप पैशाच्या जोरावर सर्व निवडणुका जिंकत होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. आता सत्ता राहिली नाही आणि सत्तेचा दुरुपयोग करता आला नाही त्यामुळे फेअर निवडणूक झाली आणि त्यात भाजपला जनतेने नाकारले आहे, हे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काही जिल्ह्यांपुरता मर्यादित पक्ष आहे असे म्हणणाऱ्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चपराक लगावली – जयंत पाटील

नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विजयी ठरत आहे. हा पक्ष केवळ दोन-तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, असे सांगणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी चपराक लगावली आहे, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

ग्रामीण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस खोलवर रुजली आहे. त्यामुळेच नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळत आहे, असे ते म्हणाले. पक्षाचे उदयोन्मुख नेतृत्व रोहीत पाटील यांनी पुढाकार घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. जयंत पाटील यांनी १० जागांवर विजय मिळवल्याबद्दल रोहीत पाटील यांचे अभिनंदन केले. याशिवाय पक्षावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे.

तरुणांच्या मागे जाण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात असल्याने काही ठिकाणी अपयश आले असले तरी तिथल्या नेत्यांची ताकद कमी आहे, असे बोलून चालणार नाही. यश आणि अपयशाच्या दोन्ही बाजू पाहाव्या लागतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्याचे समाधान जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे बळ राज्यात अधिक आहे. त्यामुळे भाजप यापुढे मर्यादित पक्ष राहणार आहे. शिवसेनेमुळे भाजपची ताकद राज्यात वाढली होती. आता शिवसेना वेगळी झाल्यावर भाजपची खरी परिस्थिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारचा जो प्रयोग केला आहे त्याला प्रतिसाद म्हणून विजयी संख्या येत आहेत. त्यामुळे जनतेनेही महाविकास आघाडीचा प्रयोग स्वीकारला असल्याचे स्पष्ट होते, असे जयंत पाटील म्हणाले.