राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक :10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! 

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर,’ बड्या मंत्र्याची माहिती

मुंबई,१ जानेवारी /प्रतिनिधी:- राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. सरकारने निर्बंध लावले असले तरी त्याचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक जण मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे.  राज्यात 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 67 , तर मुंबईत 5 हजार 428  नवे रुग्ण असून 454 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले. लग्नसोहळे आणि राजकीय नेतेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.

राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या या संख्येमुळे टेन्शनही वाढत आहे. आज राज्यात  9 हजार 170 नवीन रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात 6 ओमायक्रॉन रूग्ण आढळले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 तर पुणे महापालिका हद्दीत एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या 460वर जाऊन पोहचली आहे.

दुसरीकडे मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत दिवसभरात 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत मुंबई नवे 919 रुग्ण वाढले आहेत

5 हजार 712 रुग्णांमध्ये लक्षणं आढळली नाहीत. दिलासादाक बाब म्हणजे दिवसभरात फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तूर्तास लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही. 

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जनतेला दिलासा दिला आहे. लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना रुग्णसंख्या 15 हजारावर पोहचेल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.

राज्यातील कोरोनाचा  धोका वाढत आहे. कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

पाश्चात्य देशांत प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही  अजित पवार यांनी केले.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

शाळा, मुंबई लोकल अशा सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल

“तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले.

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! 

भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.