एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत १४.९७ लाख कोटी रुपये एकत्रित जीएसटी संकलन

डिसेंबर 2023 साठी 1,64,882 कोटी एकत्रित जीएसटी महसूल संकलन

नवी दिल्ली ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-  एप्रिल-डिसेंबर 2023 कालावधीत, सकल वस्तू आणि सेवा कर संकलन 12% वर्ष – दर – वर्ष मजबूत वाढ नोंदवत 14 .97 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी  (एप्रिल-डिसेंबर 2022) याच कालावधीत 13.40 लाख कोटी रुपये एकत्रित वस्तू आणि सेवा कर संकलन झाले होते.

या वर्षी पहिल्या 9 महिन्यांच्या कालावधीत झालेले 1.66 लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक एकत्रित वस्तू आणि सेवा कर संकलन हे आर्थिक वर्ष 23 च्या याच कालावधीतील 1.49 लाख कोटी रुपयांच्या सरासरीच्या तुलनेत 12% वाढ दर्शवते.

डिसेंबर 2023 मध्ये संकलित झालेला एकत्रित वस्तू आणि सेवा कर महसूल 1,64,882 कोटी रुपये आहे. यापैकी  केंद्रीय वस्तू आणि सेवा कर 30,443 कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा कर 37,935 कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर 84,255 कोटी रुपये ( यामध्ये आयात केलेल्या मालावर संकलित केलेल्या 41,534 कोटी रुपयांचा समावेश आहे )  उपकर 12,249 कोटी रुपये आहे (यामध्ये आयात केलेल्या मालावर संकलित केलेल्या 1,079 कोटी रुपयांचा समावेश आहे).  उल्लेखनीय बाब म्हणजे, 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक संकलन झालेला या वर्षी आतापर्यंतचा हा सातवा महिना आहे.

सरकारने एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून 40,057 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि 33,652 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात प्रदान केले आहेत.  नियमित निपटाऱ्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर रुपात 70,501 कोटी रुपये आणि राज्य वस्तू सेवा कर रुपात 71,587 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2023 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर  महसुलापेक्षा 10.3% जास्त आहे.  या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) संकलित झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 13% जास्त आहे.