मेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल

विधिमंडळाच्या अधिवेशनात वेधले लक्ष

पदांच्या निर्मितीसह हॉस्पिटल हस्तांतर करण्याची मागणी

जालना,१२ डिसेंबर/ प्रतिनिधी :-जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा तिढा त्वरित मार्गी लावण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत,महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या पदांची निर्मिती करून अपेक्षित असलेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून काल सोमवारी पुरवणी मागण्यांवर जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसह येणाऱ्या अडचणी,पदनिर्मिती,अपेक्षित निधी आदी मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ” उनको देख के आजाती हैं मुपे रौनक ! उनको लगता है बिमार का हाल अच्छा है !! असा खास शेर सभागृहात सादर करून आ.कैलास गोरंटयाल यांनी जालना येथील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे संदर्भात प्रशासकीय पातळीवर येत असलेल्या अडचणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.

ते म्हणाले की,जालना येथे राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले,अधिष्ठाता(डीन) यांची नियुक्ती केली,मात्र,प्रशासकीय पातळीवर अत्यंत छोट्या छोट्या त्रूट्यांमुळे जागेचा तिढा कायम आहे.जागेच्या संदर्भात असलेल्या त्रुट्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने लक्ष घालून दूर कराव्यात अशी अपेक्षा आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केली.याशिवाय जालना येथील हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अत्यंत संथगतीने केली जात असल्याकडे ही त्यांनी लक्ष वेधून सदर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

या महाविद्यालयासाठी श्रेणी १ ते ४ पदांची निर्मिती तात्काळ करावी,प्रशासकीय अधिकारी यांच्या नावावर पुस्तके अथवा खाते आहे त्याला सीआरसी कोट उपलब्ध करणे गरजेचे आहे.एन.एम.पी.मानद नुसार कक्षा १ ते ४ करावे,एन.एम.सी.अंतर्गत फर्निचर,पुस्तिका,पत्रिका व अन्य आवश्यक बाबींसाठी अपेक्षित निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि विद्यार्थी वस्ती गृहासाठी किमान ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करून या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जालना शहरातील सर्व्हे नंबर २०४ / १ मध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात आली.मात्र,त्यात काही जमीन ही वनखात्याची असल्याने त्यांनी याबाबत आक्षेप घेतला होता.त्यामुळे आपण स्वतः त्या ठिकाणी जावून वनविभाग आणि महसूल विभागाच्या असलेल्या जमिनीची उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित केली.महसूल विभागाने सदर जमीन मेडिकल कॉलेजच्या नावावर नामांतर करून पिआर कार्डवर(आखीव पत्रिकेवर)नियमाप्रमाणे नोंद घ्यावी अशी मागणी करत संबधित विभागाचे अधिकारी छोट्या छोट्या त्रुट्या काढून अडचणी निर्माण करून जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केला.मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यावर सध्या काही प्रमाणात अतिक्रमण असून ते हटेल तेव्हा हटेल मात्र तो पर्यंत वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीतून अर्धा एक्कर जागा रस्त्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आ.कैलास गोरंटयाल यांनी केली.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसह अन्य अडचणी आ.कैलास गोरंटयाल यांनी काल सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आ.गोरंटयाल यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आज मंगळवारी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.या बैठकीस आ.कैलास गोरंटयाल यांच्यासह वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे,वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर,वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर,जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर चौधरी यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तसेच जालना येथील अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार,जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी देखील व्हिसीद्वारे बैठकीस हजेरी लावली.या बैठकीत आ.कैलास गोरंटयाल यांनी अडचणींचा पाढा वाचल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्थानिक पातळीवर जागेबाबत निर्माण झालेल्या अडचणी त्वरित दूर करण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.