अवघड आणि आव्हानात्मक काळात गृहखात्याची जबाबदारी-दिलीप वळसे पाटील

मुंबई, दि.6 : गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले.

“अवघड आणि आव्हानात्मक काळात माझ्यावर ही जबाबदारी आली आहे. कोरोनामुळे संपुर्ण पोलीस दल फिल्डवर कार्यरत आहे. पोलीस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आहे. परंतु कोरोना काळात जी बंधने राज्य सरकारने घातली आहेत, त्याचीही अंमलबजावणी पोलीस दलाला करावी लागते. तसेच या महिन्यात गुढीपाडवा आहे. रमजानची सुरुवात होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती देखील या महिन्यात आहे. प्रत्येक धर्मीयांच्यादृष्टीने हा महिना महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक वर्गाच्या विविध अपेक्षा असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महिना आव्हानात्मक असा आहे. गृहविभागाकडून महिला आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षा असतात. या सर्वांना पोलीस दलाबाबत विश्वास वाटला पाहीजे. सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा माझा मानस असेल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.