विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ‘वंदे मातरम्’ आणि राज्य गीताने सुरुवात

नागपूर ,७ डिसेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधानसभा व विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह  मंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली.

विधानसभा तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे आणि ॲड. यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.

विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर

 राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, नरेंद्र दराडे यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी विधानपरिषदेत केली.

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

विधानसभेत दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.

विधानसभेचे विद्यमान सदस्य गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी मंत्री बबनराव ढाकणे तसेच विधानसभेचे  माजी सदस्य गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मंजूर केला. दिवंगत सदस्यांच्या विधानसभेतील कामकाजास अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी उजाळा दिला. यावेळी सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि मागील कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी शोकप्रस्ताव मांडला.