दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत सांगितले. तसेच कोणाकडे याप्रकरणी पुरावे असतील तर ते एसआयटीकडे द्यावेत असेही फडणवीस यांनी आवाहन केले.

काल संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तेव्हापासून दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भाशी निगडीत अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल ‘एयू’ नावाने आले असल्याची माहिती शेवाळेंनी संसदेत बोलताना दिली. ‘एयू’ (एयू) म्हणजे, आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली. यामुळे एयू म्हणजे नेमकं कोण? राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य? तसेच, रियाच्या फोनवर आलेले एयू नावाचे फोन आदित्य ठाकरेंचेच होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चर्कवर्तीच्या फोन रेकॉर्ड्सही तपासले होते. त्यावेळी रियाचे एयू नावाच्या व्यक्तीसोबत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ४४ वेळा संभाषण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी ही व्यक्ती म्हणजे, आदित्य ठाकरे असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, यासोबतच सुशांतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणही पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सची चौकशी केली. त्यातून एयू ही व्यक्ती आदित्य उद्धव ठाकरे नसल्याचे समोर आले होते. तर रियाच्या फोनवर फोन करणारी व्यक्ती रियाची मैत्रीण अनन्या उधास असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र ‘एयू’ (एयू) म्हणजे, आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी लोकसभेत दिल्याने आता हे वादग्रस्त प्रकरण पून्हा एकदा चर्चेत आले आहे.

अभिनेते सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांच्या नावांची चर्चा का होत नाही, हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. .

पुढे नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. जेव्हा ते पक्षाला पेट्या पाठवत होते. तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्याने त्यांची किंमत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. ८ जून रोजी काय झाले? दोन वेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले? या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले? तसेच फ्लॅटच्या विजिटर्स बुकमधील पाने कोणी फाडली? दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही? या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे म्हणाले.

View Post