पंकजाताई लोकसभेत आणि धनुभाऊ विधानसभेत?

बीड ,५ डिसेंबर / प्रतिनिधी :- गेली दशकभर बहीण भावाच्या संघर्षाचा वणवा पेटत होता, त्याच्या ज्वाळा आता शांत होण्याच्या मार्गावर आहेत. राजकीय महत्वकांक्षेपोटी काकांपासून वेगळं होऊन सवता सुभा मांडलेल्या धनंजय मुंडे यांनी जवळपास गेली दहा वर्षे त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याशी टोकाचा संघर्ष केला. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीला अनुसरून दोघा बहीण भावांनी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे आज तर धनंजय मुंडे यांनी आमच्यातला संघर्ष संपल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे ‘आदेशावरून’ दिल्लीकडे कूच करून धनंजय मुंडे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा करतील, अशी चर्चा राजकीय जाणकार करत आहेत.

राजकीय परिस्थितीशी जुळवून घ्या, बहीण भावाला अप्रत्यक्ष संदेश

महायुतीचं सरकार आल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे प्रथमच एका मंचावर (राजकीय/ प्रशासकीय) आले होते. त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल अशी कुणकुण लागली तेव्हापासूनच दोघा बहीण भावांनी एकमेकांविरोधातील तलवारी म्यान करून बदललेल्या राजकीय परिस्थितीशी अनुरूप एकमेकांशी जुळवून घेण्याचं धोरण ठरवलं. त्याचाच परिपाक म्हणजे तब्बल एका तपानंतर मुंडे बहीण भावांनी एकत्र रक्षाबंधन साजरं केलं. यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकांकडेही राज्याचं लक्ष होतं.

आज बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांनीही तडफदार भाषणं केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही ‘पंकजाताई आणि धनुभाऊ सोबत राहा.. जिल्ह्याचा विकास करा, तुम्हाला एकत्र आलेलं जनतेला पाहायचंय’ अशी इच्छा बोलून दाखवत पुढील राजकीय परिस्थितीशी जुळवून घ्या असंच दोघांना अप्रत्यक्षपणे सांगितलं.

आमच्यातला संघर्ष संपला!

कार्यक्रम संपल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धनुभाऊंना गाठून पंकजाताईंबरोबर मंच शेअर केल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांना एक्सक्लुझिव्ह बातमीच दिली. ते म्हणाले, आमच्यात राजकीय मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. महायुती सरकारमध्ये आल्यानंतर आमच्यात जो राजकीय संघर्ष होता तो संपला. राजकारणात त्या वेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, विचारांनी वेगळे होतो. आता महायुतीच्या माध्यमातून हे सर्व विचार एकत्र आल्यानंतर आमच्या बहीण-भावामध्ये अंतर पडायचं कारण नाही”.

“आम्ही याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. पण ज्या मजबुतीने जिल्ह्याचं नेतृत्व व्यासपीठावर आज पाहायला मिळालं, त्याचा आनंद सगळ्यांनाच होता, व्यासपीठावर जिल्ह्याचं नेतृत्व एकत्र आल्याचा आनंद पंकजा ताईंनाही होता व मलाही होता. या पंचक्रोशीतल्या अनेकांना असं वाटतं की आम्ही दोघांनी आधी जसं एकत्र काम करत होतो, तसंच एकत्र काम करावं”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

परळीच्या विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी-पंकजा मुंडे

 परळीच्या विकासासाठी माझी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जात, धर्म, पक्ष बघितला नाही. कोणताही द्वेष मनात ठेवला नाही. कारण तुमचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. ते ऋण फेडण्याचे काम आम्ही करत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

सामान्य माणसाच्या हितासाठी, वंचितांसाठी वाली बनण्यासाठी आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून काम करु असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तीन राज्यामध्ये भाजपचे सरकार आले आहे. त्या राज्यातील काही योजना आहेत, त्या योजना आपण आणाव्यात, तसेच आरक्षणाचा प्रश्न असेल याबाबत तोडगा काढावा अशी विनंती पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना केली.  

थंडीच्या दिवसात जास्त गरम होत आहे. कारण शिंदे-फडणवीस-पवार एका मंचावर आले आहेत. याहीपेक्षा जास्त गरमी यामुळं वाढली आहे की, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

बीड जिल्ह्यातील परळी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. मागील वर्षभरात यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले होते. मात्र दोन्हीवेळी पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नव्हत्या.