विधानाचा विपर्यास :हक्कभंग नोटिशीला संजय राऊतांचे उत्तर

मुंबई,८ मार्च  /प्रतिनिधी :-काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावर विधिमंडळातील फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही आक्षेप घेतला होता. तसेच, त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस देण्यात आली होती. यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिले असून ते म्हणाले की, “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला” असा दावा त्यांनी केला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी मुंबईच्या बाहेर असताना या विधानाचा विपर्यास करण्यात आला. हे विधान विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केले नव्हते. ते एका विशिष्ट गटापुरते मर्यादित होते. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि यापुढेही नसणार. मी केलेले विधान तुम्ही तपासू पाहावे,” असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खासदार संजय राऊतांनी, “विधिमंडळ हे चोरमंडळ, गुंडामंडळ आहे,” असे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर मोठा गदारोळ माजला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय चांगलाच लावून धरण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील त्यांच्या या विधानांवर अधिवेशनात आक्षेप नोंदवला होता.