आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा:उच्च न्यायालयात दाद मागणार

नाशिक(प्रतिनिधी): अनोख्या शैलीतल्या आंदोलनांसह वादग्रस्त आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांना शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात कडू यांना जिल्हा न्यायालयाने त्वरित अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात बच्चू कडू यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर आमदार कडू यांनी हात उगारला होता. सरकारवाडा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आमदार कडू यांना त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नाशिक महापालिकेत अपंगांसाठी असलेला तीन टक्के राखीव निधी खर्च न केल्यामुळे झालेल्या वादात आमदार कडू आयुक्तांवर संतप्त झाले होते. कडू यांनी आयुक्तांबरोबरच अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली होती. या प्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्त कृष्णा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

प्रकरणाची पार्श्वभूमी :

प्रहार संघटनेच्या वतीने २०१७ साली नाशिक महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला स्वतः बच्चू कडू आले होते. दिव्यांगांच्या प्रश्नावरती आयुक्त आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा चालू असताना वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी आयुक्तांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला होता. याच आंदोलनानंतर बच्चू कडू यांच्यावरती नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात महापालिका प्रशासनाकडून तक्रार देण्यात आली होती आणि त्यानंतर २०१७ पासून नाशिकच्या सत्र न्यायालय सुनावणी सुरू होती. त्या सुनावणीवर आज निकाल लागला.