महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वेगवेगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असं त्यांनी खडसावलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की असं वक्तव्य भिडेगुरुजींनीच नव्हे तर कोणीच करु नये. करोडो लोकांमध्ये अशा वक्तव्यामुळे संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधींच्या विरोधात असं बोललेलं कधीही सहन करणार नाहीत आणि यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असे खडे बोल देवेंद्र फडणवीसांनी सुनावले आहेत.

उगाच राजकीय रंग देऊ नका

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडेगुरुजींचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. खरं म्हणजे, जसं याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. पण ते त्यावेळी मात्र मिंधे होतात आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही.

संभाजी भिडे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले?

संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं होतं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.