संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर राजकारणी तापले

दीपक केसरकर म्हणतात भिडेंचं वय झालंय तर छगन भुजबळांची कठोर कारवाईची मागणी

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी त्यांच्या विदर्भ दौर्‍यामध्ये अमरावतीत महात्मा गांधीजींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तर यवतमाळमध्ये त्यांनी पंडित नेहरु यांच्याबद्दलदेखील वादग्रस्त वक्तव्य केलं. या गोष्टीवरुन राजकारणी, आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना सध्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा तीव्र विरोध दर्शवला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, संभाजी भिडेंना मी ओळखतो कारण ते गडकिल्ल्यांच्या संदर्भात काम करतात. एक तर त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणं बंद केले पाहिजे. आणि ज्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं आहे, मला वाटतं की हा वयोमानाचा परिणाम आहे. आमच्या गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे सगळं तपासून बघू. माझी स्वतःची त्यांच्याशी भेट झाली तर मी सांगेन की अशा प्रकारच्या विधानांमुळे राज्यालाच नाही तर देशालाही दुःख होतं त्यामुळे हे थांबवा, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

छगन भुजबळ म्हणतात…

महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, असं क्वचित देश असेल जेथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. त्यांच्यावर जे गलिच्छ स्वरूपात टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यासोबत जाणं राजकारणासाठी आत्मघातकी आहे, महात्मा गांधींना असं बोललं तर देशातीलच तर नाहीच, गुजरातमधील कुठलाही बांधव-भगिनी सहन करेल का मग ते मोदी असतील किंवा शाह असतील, असं छगन भुजबळ म्हणाले.

त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवीन काहीतरी बोलत राहतात. काल ते पंडित नेहरूंनी देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणतात. पण त्यांचे वडिल देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वतः साडेअकरा वर्ष नेहरू तुरुंगात राहिलेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करू नका पण असली टीका मला आवडत नाही, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रीकृष्ण कुलकर्णीचे वंशज – यशोमती ठाकूर

काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन सुरु झालं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आता काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भिडेंबद्दल मोठा दावा केला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.

संभाजी भिडे यांच्याविषयी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हा माणूस इतका घाणेरडा आहे.भिडे ज्या भागातून येतात तिथे फोन लावला आणि हा माणूस कसा आहे असं विचारलं. तेव्हा संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रकृष्ण कुलकर्णी यांचे वंशज आहेत.असं स्थानिक लोक सांगततात. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय, दुसरकडे सरकार त्यांनी खुलेपणाने फिरू देत आहे, असं यशोमती ठाकून म्हणाल्या आहेत.

यावेळी यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यची मागणी केली.तसंच “देशाच्या इतिहासाची तोडमोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही.हे असंच करत राहीले आणि समाजात अशांतात पसरवली, १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला तर याला जबाबदार गृहखातं, पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल”, असा इशारा देखील त्यांनी दिला.