समुद्रसेतू-2 मोहिमेत सहभागी झालेले आयएनएस त्रिकंड हे जहाज मुंबईत दाखल

मुंबई, 10 मे 2021

समुद्रसेतू-2 मोहिमेचा भाग म्हणून, कतारच्या हमाद बंदरावरून द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे क्रायोजेनिक कंटेनर्स मुंबईपर्यंत वाहून आणण्याची जबाबदारी भारतीय नौदलाच्या त्रिकंड या जहाजावर सोपविण्यात आली होती. हे जहाज 05 मे 21 रोजी कतारमध्ये पोहोचले आणि 40 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायूसह 10 मे 21 या दिवशी मुंबईत पोहोचले.

कोविड साथीचा मुकाबला करण्यासाठी भारताला फ्रान्सकडून ‘ऑक्सिजन सॉलिडॅरिटी ब्रिज’ या मोहिमेअंतर्गत प्राणवायूची मदत पुरविण्यात येत आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून प्राणवायूचा सदर साठा भारताला पाठविण्यात आला आहे. फ्रान्सच्या द्रवरूप प्राणवायू कंटेनर्सची कतारमार्गे भारताकडे झालेली ही पहिली खेप आहे. भारताचे कतारमधील राजदूत डॉ.दीपक मित्तल यांच्या पुढाकाराने सुरु झालेया या भारत-फ्रान्स उपक्रमाद्वारे, येत्या दोन महिन्यांत भारतासाठी 600 मेट्रिक टनापेक्षा अधिक द्रवरूप प्राणवायू पोहोचविला जाण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत दाखल झालेला प्राणवायूचा पहिला साठा, महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईतील फ्रेंच वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्य दूत सोनिया बारबरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.