राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळणार -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले  

नांदेड , १२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी तथा शिक्षकांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन संशोधन प्रकल्प तयार करावा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोग्य, औषध निर्माणशास्त्र, शेती, नैसर्गिक साधन संपत्ती, जल व्यवस्थापन, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता इत्यादी अशा अनेक क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून आर्थिक अनुदान मिळत आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा आणि विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनाला अधिकाधिक चालना मिळावी असे प्रकल्प सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले. 

गुरुवार (दि.१०)विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या प्रसंगी आयोगाचे वैज्ञानिक अधिकारी दिनेश जगताप यांची विशेष उपस्थिती होती. सन २०१४ पासून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाशी संलग्नित समाजउपयोगी संशोधन करणाऱ्याला आयोगातर्फे नेहमीच मदत होत असते. 

या कार्यशाळेमध्ये वैज्ञानिक अधिकारी दिनेश जगताप यांनी प्रकल्प कसे सादर करावेत,कोणत्या विषयावर करावेत याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.यामध्ये स्थानिक गरजा लक्षात घेऊन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रकल्प सादर करण्यावर भर देण्यात आलेला आहे. 

या कार्यशाळेसाठी विद्यापीठ संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. संजय पेकमवार,सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, मोहन किरडे, हरिदास जाधव यांनी विशेष परिश्रमघेतले.