काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात :राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला

देगलूर , ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री शेजारील तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहोचली. यावेळी राहुल गांधी मशाल घेऊन पुढे सरसावले. भारत जोडो यात्रा 14 दिवसांच्या मुक्कामात राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघ आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. ही यात्रा मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागातून जाणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवताच राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या आराध्य दैवतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सोमवारी रात्री हजारो मशाल घेऊन राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाले. तेलंगणातून महाराष्ट्रात पोहोचल्यावर तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी नाना पटोले यांना तिरंगा ध्वज सुपूर्द केला.

यावेळी राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पदयात्रा सुरू होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ते म्हणाले की,आज देशात अनेक ज्वलंत समस्या आहेत, मात्र केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही.हे सरकार फक्त चार-पाच भांडवलदारांसाठी काम करत आहे. नोटाबंदीमुळे देशातील छोटे उद्योग ठप्प झाले.400 रुपयांचा गॅस सिलिंडर 1100 रुपयांचा झाला असून पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झाले आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शब्द बोलत नाहीत.  

राहुल गांधी म्हणाले, आज देशात नकारात्मकता , अशांती पसरवली जात आहे. आमचे लक्ष्य देश आणि महाराष्ट्रातील आवाज, महाराष्ट्राचे दुःख हे आहे. देशात बेरोजगारी आहे. आधी पंतप्रधान डिझेल- पेट्रोल गॅसबाबत बोलत होते. पण गॅस सिलींडरचे दर वाढले, डीझेल – पेट्रोलचे दर वाढले आता पंतप्रधान मोदी गप्प आहेत. याच मुद्यांसाठी आम्ही सलग चालत आहोत.

आज महागाई मेटाकुटीला

राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी, चुकीची जीएसटीने देशात महागाई वाढली. आपल्याच युवकांना देश रोजगार देऊ शकत नाही हे मोदींच्या सत्ताकाळातील महत्वाच्या बाबी आहेत. देशातील महागाई हा मुळ प्रश्न आहे. यात्रेत दिवसभर आम्ही विविध लोक आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकतो आणि रात्री पंधरा मिनीट आम्ही आमची गोष्ट सर्वांसमोर ठेवतो हेच आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत.

शिवाजी महाराज इतिहास जाज्वल्य

राहुल गांधी म्हणाले, मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभा राहून मी हे बोलतोय याचा मला अत्यानंद होत आहे. कारण शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपल्याकडे आहे. रात्रीची वेळ आहे. दहा वाजताची आमची कट ऑफ वेळ आहे. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही.

आदित्य ठाकरे ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेत राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचा सहभाग अनिश्चित असला तरी आदित्य ठाकरे मात्र यात सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, “भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच या यात्रेत सहभागासाठी गर्दी जमायला लागली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत की नाही, याची माहिती नाही. पण आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.”

दरम्यान, भारत जोडो यात्रा सोमवारी राज्यात दाखल होणार असून त्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथपर्यंत पोहोचली आहे. भव्य मशाल यात्रेद्वारे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार

‘भारत जोडो’ या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.