“त्याला काय करायचं ते कर, मराठ्यांना आरक्षण ओबीसींमधूनच घेणार!”, जरांगे-पाटलांनी जालन्यातून शड्डू ठोकला

जालना,१ डिसेंबर/ प्रतिनिधी :-राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी देणार नाही, असं थेट आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे. आम्ही गेल्या ७० वर्षापासून कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्या केला जातोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा, अशा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर असं चँलेंज देखील छगन भुजबळ यांना दिलं आहे. ते जालना येथील सभेत बोलत होते.

तसंच, यावेळी त्यांनी मुंबईत येणार असल्याचाही इशारा दिला. मिश्किल भाषेत आज त्यांनी मुंबई दर्शन करण्यास येणार असल्याचं सांगितलं. तसंच, मंत्रालय किती उंच आहे हेही या मुंबई दर्शनावेळी पाहणार असल्याची खोचक टीका जरांगे पाटलांनी केली.

यावेळी जरांगे यांनी जालना येथील झालेल्या लाठीचार्जवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला, त्यांचं रक्त सांडलं. इतकं निष्ठूर सरकार आम्ही पाहिलं नाही. एकीकडे म्हणता आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यांनतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये असं काय झालं की त्याठिकाणी संचारबंदी केली, असं म्हणत त्यांनी आम्ही लातूरला कार्यक्रम घेणारचं. आमच्या लोकांवर अन्याय केला तर पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही. एका व्यक्तीच्या दबावामुळे हे सगळ होत असेल तर सहन करणार नाही, असं जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना जरांगे यांनी कार्यकर्त्यांच्या अटकेवर भाष्य केलं. अंतरवालीतील गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे एका महिन्यात मागे घेणार होते. उदय सामंत, धनंजय मुंडे साहेब संदीपान भूमरे साहेब, अतुल सावे साहेब यांनी सांगितलं आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही, असं सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना का अटक केली? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे.

24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा, मराठा शांत आहे. असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं. मराठ्यांना २४ तारखेला सरसकट आरक्षण मिळणार आहे. तसं झालं तर काय करायचं ते पाहू असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

ते पुढे म्हणाले, सगळे लोक मुंबईत जातात. अख्खं जग मुंबईत येत असतं. मग मुंबई आमची आहे की नाही? मुंबईला यायला आम्हाला काही हरकत नाही. आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करणार नाही. मुंबईचं विमानतळ कसं आहे ते आम्हाला पाहायचं आहे. मुंबईचा समुद्र, गेट ऑफ इंडिया बघायचा आहे. बिस्किटं कसली बनतात हे पाहायचं आहे. मुंबईत येऊन आरक्षण द्या असं म्हणणार नाही. पण, ताज हॉटेल म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय? ते कसलं असतं हे आम्हाला पाहायचं आहे. तिथे खूप जपानच्या कंपन्या आहेत हे पाहायचं आहे. नोटा छापायची इमारत पाहायची आहे. मंत्री कोणत्या गादीवर बसतात हे पाहायचं आहे. मंत्रालय किती उंच आहे हे पाहुदेत. लोकं म्हणतात की वर पाहायला गेलं की टोपी पडते. आम्हालाही पाहायचं आहे. आम्ही आमची भाकरी घेऊन येऊ. आम्हाला नुसती मुंबई बघायची आहे. बाकी काही करायचं नाही. आम्हाला वाटतं स्वच्छ महाराष्ट्र आणि भारत राहावा. पण नैसर्गिक विधी आम्ही थांबवू शकणार नाही. त्याची सोय करावी लागेल, अशा मिश्किल शब्दांत आज जालन्याती सभा मनो जरांगे पाटलांनी गाजवली.

ते पुढे म्हणाले की, आमच्या जातीच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. तुम्ही आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साध द्यायला तयार आहोत. पण, तुम्ही जर आमच्या लेकराचे मुडदे पाडले तर आम्हीही मुंबईत यायला मागे पुढे बघणार नाही. मी पुढे चालायला लागलो तर माझ्या मागे पुढे दोन कोटी लोक येतील. दोन कोटी लोकांच्या शौचासाठी किती सोय करावी लागेल? आम्हाला मुंबईला यायचं नाही, पण आमच्याशी दगाफटका करू नका. आमच्याशी दगाफटका केला तर काय होईल? उग्र काही होणार नाही. उग्राला आमचं समर्थन नाही. शांततेचं आंदोलन कोणालाही पेलत नाही. म्हणून आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलं आहे. ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलं आहे. आता २४ डिसेंबरला सर्व मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे, असाही विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित केला.