अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे आज उद्घाटन आणि संकेतस्थळाचे लोकार्पण  

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) ,२ डिसेंबर / प्रतिनिधी :- ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण तसेच विविध समित्यांची घोषणा ३ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा संमेलनाचे निमंत्रक अनिल भाईदास पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन तसेच संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मराठी वाङ्‌मय मंडळ, नांदेडकर हॉल, अमळनेर येथे सकाळी १० वाजता होईल.

वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन होय. यंदाचे ९७ वे मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होत आहे. तब्बल ७२ वर्षांनंतर २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात रसिकांचा मेळा रंगणार आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य प्रेमी आदी मंडळी पुढे सरसावली आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

शहरातील साहित्य प्रेमींनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन म.वा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्या