ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो-देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त टोला

शिर्डी ,१७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात ‘शासन आपल्या दारी’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळेस २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. तसंच, आमचं सरकार ‘फेसबुक सरकार’ नव्हे तर ‘फेस टू फेस सरकार’ आहे, असा जबरदस्त टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. तर वर्षाचे ३६५ दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारं सरकार नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढेही पोहोचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहोचत आहेत, असंही पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन, त्याची अजून देखील दहशत आहे. २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो.

हो आहे आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, पण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला असून दोघांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका केली जाते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आमचे लक्ष तिथे आहे, असं फडणवीस म्हणाले.