भाजपचं हिंदुत्व नेमकं काय? हे सिद्ध करा; चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई,११  एप्रिल / प्रतिनिधी :-  भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडली तेव्हा त्यामध्ये शिवसैनिक किंवा बाळासाहेब ठाकरेंचा संबंध नसल्याचे विधान केले. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून ठाकरे गट चंद्रकांत पाटील, भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या विधानावर टीका केली. ते म्हणाले, “एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. दुसऱ्या बाजूला बाबरी आम्हीच पाडली म्हणतात. आता भाजपने त्यांचे हिंदुत्व काय? हे सिद्ध करावे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “बाबरी पाडली तेव्हा हे गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर सगळे उंदीर बिळात लपले होते. आपले पंतप्रधानसुद्धा कदाचित त्यावेळेस हिमालयात असतील. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारींनी आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते.” असे स्पष्टीकरण देत, ‘ हे गोमुत्रधारी हिंदुत्व देशाच्या कामाचे नाही,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले की, “बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा शिवसेना नव्हती, असे विधान करणे हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. त्यामुळे, ‘बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही भाजपसोबत गेलो’ असे म्हणणाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा.” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. ते म्हणाले की, “कोण म्हणते या तुरुंगात होतो, तर कोण म्हणते त्या तुरुंगात होतो. इतके दिवस का गप्प होतात? मोगलांचा इतिहास पुसता पुसता आता हिंदूंचाही इतिहास पुसणार का? बाबरी पाडल्यानंतर मुंबई शिवसेनेने वाचवली. तो लढा देशद्रोह्याच्याविरुद्ध होता. हळूहळू बाळासाहेब ठाकरेंचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा हा प्लॅन आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.