उद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेतात, हे चुकीचे आहे, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी संवाद साधणे आवश्यक होते

शरद पवारांनी टोचले उद्धव ठाकरेंचे कान

मुंबई : कुणाशीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कुणाशीही चर्चा न करता, संवाद न साधता उद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेतात, हे चुकीचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले.

मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण तुम्हाला तीन पक्षांनी मिळून मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अदानी प्रकरण असो वा इतर मुद्द्यांवरून पवारांचे मत हे विरोधी पक्षांशी जुळत नसल्याचे समोर आले. त्यात आता महाविकास आघाडीतील झालेल्या मतभेदांवर शरद पवारांनी उघडपणे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला, असे विधान करत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची कानउघाडणी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरून भाजपा-ठाकरे गटात रणकंदन माजले होते. त्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ला टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे. उद्धव ठाकरे हे फडणवीसांना फडतूस बोलले नसते तर फडणवीसांनीही काढतूस काढले नसते, असे सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधानांच्या मुद्द्यांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीची एकजूट तर मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीत मोठी घडामोड घडत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षनेते उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.

उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय.बी.ची चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.