भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही : फडणवीस

मुंबई : बिहारमध्ये भाजपचे ७५ आमदार निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे ४२ आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना चोख उत्तर दिले आहे. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला.