महिला अत्याचार, कोरोना मृत्यू, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरणार-विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात पत्रकार आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवायांना अघोषित आणीबाणीची उपमा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याची एक झलकच रविवारच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली. महिला अत्याचार, कोरोना मृत्यू, कोरोना काळात सुरू असलेले भ्रष्टाचार, रखडलेले प्रकल्प आदी मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले.

Image

मराठा आरक्षणावर सरकारची ठोस भूमीका नाही
 फडणवीस सरकारच्या काळात देण्यात आलेले मराठा आरक्षण राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात टीकवून ठेवता आले नाही. न्यायालयाने या आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतरही सरकारतर्फे हे आरक्षण लागू व्हावे यासाठी जातीने लक्ष दिले जात नाही. आरक्षणावर ठाम भूमीकाही सरकारला घेता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
 शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत
 राज्यात आलेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि ओला दुष्काळ यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही योग्य ती मदत पोहोचली नाही. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले, अशी टीकाही त्यांनी केली. या संदर्भात अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, असल्याची घोषणा त्यांनी यावेळई केली.
 योजना बंद हा फडणवीसांना नव्हे तर जनतेला धक्का
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार हे फडणवीस सरकारच्या काळातील अनेक महत्वकांशी योजना बंद करण्याचा घाट घालत आहे. आरे कारशेडसह अन्य महत्वकांशी योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, अनेकदा आमच्या सरकारच्या काळातील योजना बंद करून फडणवीसांना धक्का, असे म्हटले जाते. मात्र, जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या कल्याणकारी योजना आणि प्रकल्प स्थगिती देऊन जनतेला धक्का दिला जात असल्याचे ते म्हणाले.
 
 
काजूरमार्गला मेट्रो गेल्याने २०२४ पर्यंत रखडणार
 
आरे मेट्रो कारशेडचे काम पूर्णत्वात आले असतानाही राजकीय सूडापोठी हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आले आहे. त्यातही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील जागेवरून वाद आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आता २०२४ पर्यंत रखडेल, तसेच त्यासाठी लागणारा खर्चही वाढेल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
 
 
महाराष्ट्रात कोरोना सर्वाधिक मृत्यू
 
 
राज्य सरकारच्या नेतृत्वात कोरोनाशी लढा देत असताना देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले असल्याची टीका फडणवीसांनी केली. राज्यातील मृतांचा आकडा हा ४८ हजारांवर पोहोचला आहे. याला जबाबदार कोण, कोरोना काळातही भ्रष्टाचार कमी झाला नाही, या प्रकाराबद्दल सरकार काय बोलणार नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.
 
 
वीजबिलावर तोडगा का नाही ?
 
कोल्हापूरात वाहून गेलेल्या एका घरालाही भरमसाठ विजबिल पाठवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे विजग्राहकांची लुटमार कशी सुरू आहे, याचा प्रत्यय येईल, अशी टीकाही त्यांनी केली. लॉकडाऊनमध्येही विजबिलात कुठलीही सवलत सरकार देऊ शकलेले नाही, असेही ते म्हणाले.
 
 
राज्यात अघोषित आणीबाणी लागू
 
अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि कंगना प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा राज्य सरकारला चपराक देणारा ठरला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर सुडाने केलेल्या कारवाईला अघोषित आणीबाणी, असे नाव फडणवीसांनी दिले आहे.
 
 
सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही
 
 
हे सरकार अंतर्गत विरोधातून पडेल त्यावेळी आम्ही बघू, सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, असे स्पष्टीकरणीही महाविकास आघाडी आणि काँग्रेसतर्फे होणाऱ्या आरोपांबद्दल त्यांनी दिले आहे.