“ही पक्षांतर्गत फूट नसून हा तर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न”; शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

नवी दिल्ली ,२४ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी नाव आणि पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शरद पवार गटाकडून आयोगात युक्तिवाद सुरु आहे. यावेळी देवदत्त कामत यांनी हा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे. त्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २०१९ मध्ये  आघाडी करत निवडणुकीला सामोरे  गेले होते. यात ५४ आणि ४४ आमदार विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहीली नाहीस, असे  देवदत्त कामत यांनी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तीवाद करताना सांगतिलं.

शरद पवार हेच आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावरुन प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, असे  देखील देवदत्त कामत म्हणाले. यावेळी सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला असल्याचंही शरद पवार गटाकडून आयोगात सांगण्यात आलं.ही पक्षांतर्गत फूट नसून हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. अजित पवारांना पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी देखील नव्हती, असं देखील देवदत्त कामत यांनी सांगितलं.

सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं,” असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “१९९९ ते २०१८ पर्यंत २० वर्षाच्या कार्यकाळात पक्षावर, शरद पवारांवर किंवा निवडणुकीबद्दल कुठलेही आरोप-प्रत्यारोप करण्यात आले नाहीत. पण, २०१८, २०२१ आणि २०२२ साली पक्षात झालेल्या निवडणुका चुकीच्या असल्याचा आरोप २०२३ मध्ये करण्यात आला. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून हे आरोप करण्यात येत आहेत. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनेच राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आली होती.”

“पक्ष चिन्हाबाबत पहिल्यापासूनच वाद-विवाद पाहिजे होता”

“शरद पवारांना अध्यक्षपदासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अन्य लोकांनी पाठिंबा दर्शवला. मग, ३० जून २०२३ ला पक्षात फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, पक्ष चिन्हाबाबत पहिल्यापासूनच वाद-विवाद पाहिजे होता. ३० जूनपूर्वी अजित पवार गटाच्या वक्तव्यांमध्ये किंवा कागदपत्रात राष्ट्रवादीत फूट पडली, पक्षात गटबाजी आहे किंवा शरद पवार नेते नसल्याचा कुठेही उल्लेख नाही.”

“शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं, पण…”

“३० जूनला याचिका दाखल केली, तेव्हा पक्षात कुठलाच वाद नव्हता. मग, पक्ष फुटीबाबत प्रश्न कुठं येतो? तसेच, निवडणूक आयोग अनुच्छेद १५ अंतर्गत कारवाई कशी करू शकते? कुठलाही वाद नव्हता, तर याचिका निवडणूक आयोगात याचिका दाखल कशी करण्यात आली? शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं. पण, आम्ही खोट्याला प्रतिवाद करत आहोत,” असं सिंघवी यांनी सांगितलं.