प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य, नव्या नियुक्तीनंतर सचिन सावंत यांचा राजीनामा

मुंबई ,१९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष स्थिरावले आहे. पण, काँग्रेसमध्ये (congress) अजूनही धुसफूस सुरूच आहे. काँग्रेसमध्ये प्रवक्तेपदाची निवड करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले सचिन सावंत यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर ट्वीटर अकाऊंटमधूनही त्यांनी पदाचा उल्लेख हटवला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांनंतर  महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहिला मिळत आहे. सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. थेट हायकमांडला पत्र लिहून सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सचिन सावंत काँग्रेसच प्रवक्ते म्हणून काम पहात आहेत.

नवीन नियुक्तीनुसार मुख्य प्रवक्ते पदी सचिव सावंत यांच्या जागी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते राहिलेले सचिन सावंत नाराज झाले आहे. सावंत यांनी तडकाफडकी आपल्या प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

एवढंच नाहीतर सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटमधून प्रवक्तेपदाचा उल्लेख सुद्धा काढून टाकला आहे. सावंत यांनी आपली प्रवक्तेपदी निवड केली नसेल तर नवीन पदाची जबाबदारी देण्याची मागणी केली असल्याची माहितीही समोर आली आहे.