शिवसेनेचे  निवडणूक चिन्ह :सुप्रीम कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच निर्णय

मुंबई ,​६​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या  गटाने शिवसेनेचे  निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर  केलेल्या दाव्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने  मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मागील आठवड्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच निकाल देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देणं शक्य होणार का यासंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटातील युक्तीवादादरम्यान चर्चा झाली. याच सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने युक्तीवादादरम्यान केलेली मागणी निवडणूक आयोग मान्य करणार असल्याची दाट शक्यता आहे. ही मागणी मान्य झाल्यास निवडणूक आयोग सध्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्यास प्राधान्य देईल, असं चित्र दिसत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाच्या वकिलांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड युक्तिवाद केलाय. “आमच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. आमच्याकडे आमदार-खासदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष आणि नावावर आमचाच हक्क आहे”, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात केला होता.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वकिलांनी सुरुवातीला अतिशय आक्रमक पद्धतीने भूमिका मांडत शिंदे गट हीच मुख्य शिवसेना असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी याआधी घडलेल्या काही प्रकरणांची उदाहरणे दिली होती.

दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी शेवटच्या दोन दिवसांच्या सुनावणीवेळी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडली. प्रतिनिधी सभा, पक्षाची घटना पासून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी प्रकाश टाकला. त्यामुळे निवडणूक आयोगात ठाकरे गटाचे पारडे जड होताना दिसले.

दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला जातोय. या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडायला लावला होता. त्यानुसार दोन्ही गटाने लेखी म्हणणं मांडलं आहे.