काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी:राहुल गांधी वायनाडमधूनच लढवणार निवडणूक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४पाहता काँग्रेसनेउमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या ७ मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे ठरली होती. काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळच्या वायनाड येथून लोकसभेसाठी मैदानात उतरत आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ नावे समोर आली आहेत. यात वायनाड येथून राहुल गांधी, तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, अलप्पुझा येथून केसी वेणुगोपाल, राजनांदगाव येथून भूपेश बघल, मेघालय येथून विन्सेट पाला आणि त्रिपुरा पश्चिम येथून आशिष साहा यांचे नाव समोर आले आहे. ३९ उमेदवारांच्या यादीत १५ उमेदवार सामान्य विभागातील, तर २४ उमेगदवार मागासवर्ग, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे आहेत.

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील जागांवरच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. उत्तर प्रदेशात इंडिया गठबंधनअंतर्गत निवडणूक लढवली जात आहे. समाजवादी पक्षाने १७ जागा काँग्रेसला दिल्या आहेत. यात अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, सहारनपूर आणि मथुरा यांचा समावेश आहे.