पंकजा मुंडे, विनोद तावडे ,विजया रहाटकर भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी

Image

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे.

विजया या औरंगाबादच्या असून त्या भाजपच्या माजी महापौर आहेत. त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या निवडीआधी त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. 

भाजपची राज्य कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारीणी जाहीर केली होती. या कार्यकारणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले होते. या नेत्यांना भाजपने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपने अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. त्याबरोबरच विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 भाजपचे नाराज ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांना मात्र यात स्थान मिळालेले नाही. त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता खडसे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *