मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख; काँग्रेसच्या विरोधाला केराची टोपली

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा कडाडले

Image

मुंबई, 7 जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काँग्रेसचा नामांतरला विरोध आहे, तर दुसरीकडे भाजपने नामांतराच्या मागणीला जोर धरला आहे. अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मत व्यक्त करण्याचं आवाहन केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा कडाडले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा CMO Maharashtra या अधिकृत  अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. 

शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही-बाळासाहेब थोरात
After meeting with CM Uddhav Thackeray, Congress says 'all is well' in Maha  Vikas Aghadi

मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर प्रेमावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाराज झाले , महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध असल्याचे थोरात यांनी सांगितले . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीअसे थोरात यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया असे थोरात यांनी सांगितले.