मराठा आरक्षण आंदोलन पेटले!आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या घरांना लावली आग

बीड : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होत आहे. गावागावात आंदोलन केले जात आहे. कुठे साखळी उपोषण, तर कुठे आमरण उपोषण पाहायला मिळत आहे. अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर काही गावात सरकारचे अंत्यसंस्कार करत आंदोलन करण्यात येत आहे. तसेच यापुढे आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्यात आल्यानंतर बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली. बीडमध्ये सुरू असलेल्या ‘या’ जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.

त्यानंतर बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिले. त्याशिवाय, मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यालयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

धुळे-सोलापूर हायवेवर बीड शहरानजीक असलेल्या ‘हॉटेल सनराइज’ला संतप्त जमावाने आग लावली. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे.

बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली. यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल जमावाने पेटवल्या.

मराठा आरक्षणासाठी बीड तालुक्यातील वडवणी शहर आणि तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे तर मराठा आंदोलकांनी वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बीड परळी रोडवर आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वडवणी मध्ये कालपासून मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे आंदोलकांनी बीड परळी रोडवर निदर्शने करत असताना मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

माजलगाव नगरपरिषद पेटवली!

बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ करण्यात आली. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली.

आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी दगडफेक केली आणि पार्कींगमधील गाड्यांना आग लावली. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केले होते.

भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले

याच हिंसक आंदोलनाचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या. तसेच बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी ही केली.

जलील यांच्या घरासमोर घोषणाबाजी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना जाब विचारला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर देखील मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी जलील यांनी आंदोलकांशी चर्चा करत, आपला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठींबा असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी बीडच्या भाजप आमदाराचा राजीनामा

आरक्षणासाठी आमदार खासदारांच्या राजीनाम्याचं सत्र सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आलीये. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’ याआधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मराठा आरक्षणासाठी पदाधिकार्‍यांसह सरपंचांच्या राजीनाम्यांची मालिका

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-8261602590725377&output=html&h=174&slotname=3708670058&adk=1354892729&adf=2504326089&pi=t.ma~as.3708670058&w=696&fwrn=4&lmt=1698721479&rafmt=11&format=696×174&url=https%3A%2F%2Fprahaar.in%2Fthe-maratha-reservation-movement-ignited%2F&wgl=1&uach=W

राज्यात अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे, तर एसटींची, गाड्यांची जाळपोळ असे प्रकारही घडत आहेत. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळेस ते पाणीही घेत नाही आहेत आणि उपचार करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. दोन तीन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे.

यानंतर मराठा आरक्षणासाठी आता राजीनाम्यांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे व्यवस्थेला एका प्रकारे धाक दाखवण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी आता माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला सरपंच आहेत.

कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांनी ही उपोषणाची घोषणा केली.

अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हदगावचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही, असं पत्र सोपवत आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर केजमधील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचाही समावेश आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गदारोळ; मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर घोषणाबाजी करणारे ताब्यात

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होऊ लागले आहे. यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याशिवाय, शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या शिवसैनिकांनादेखील ताब्यात घेतले.

सोयाबीन आणि कापसाला दर मिळावा, पिक विमा, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. महिला शिवसैनिकांनी देखील घोषणाबाजी केली. त्यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना मराठा आंदोलकांनी पिटाळले

कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेना मराठा आंदोलकांनी सोलापुरातून परतवून लावले. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सुरु असलेली ही बैठक उधळून लावत सोलापुरातून परत जाण्याचा सल्ला मराठा आंदोलकांनी म्हात्रेंना दिला. त्यानंतर आमदार म्हात्रे हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले, मात्र त्यावेळी सुद्धा सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जाऊन तुफान घोषणाबाजी करत गाडीपर्यंत आणून सोडले. तसेच, “मराठा समाज संतप्त आहे, आज पारगावातील नेत्यांना आम्ही हाकलून लावतोय, यापुढे जिल्ह्यातील आमदारांना सोडणार नाही. आता जर कोणी सोलापुरात आलं तर त्याचे कपडे फाडून हाकलून लावू, असा मराठा समाज आंदोलकांनी आक्रमक इशारा दिला आहे.