अर्जुन कढे नवा राष्ट्रीय विजेता,राष्ट्रीय हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत पहिलेच विजेतेपद

Displaying Winner Ajun Kadhe with the trophy.jpg

पुणे, 21 मार्च 2021 : महाराष्ट्राच्या अर्जुन कढे याने रेल्वेच्या पृथ्वी शेखर याचा पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत 6-3, 6-4 असा सहज पराभव करून राष्ट्रीय हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर प्रथमच आपले नाव कोरले.गुरुग्राम, बलियावर्स येथील टेनिस प्रोजेक्ट येथे ही स्पर्धा पार पडली. 

यापूर्वी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्बल तीन वेळा पराभूत झालेल्या अर्जुन कढे याने त्याला इतके दिवस हुलकावणी देणारे हे राष्ट्रीय विजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. अर्जुन कढे पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
केवळ 27 वर्षीय अर्जुन कढेने यापूर्वी 12,14,16 व 18 वर्षाखालील तसेच, पुरुष एकेरी व दुहेरीत राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. 

Displaying Mens Singles winner Arjun Kadhe received the award from chief guest.jpg


महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या श्रीवल्ली भामिदीप्ती हिने गुजरातच्या अव्वल मानांकित वैदेही चौधरीचा 6-2, 7-6(7-2) असा पराभव करून राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकावला.
महिला दुहेरीत अंतिम लढतीत साई संहिता व रिशिका सुंकारा या जोडीने सोहा सादिक व सौम्या वीज या अव्वल मानांकित जोडीचा  7-5, 7-6(2) असा दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीत गटविजेत्या निकी पोनाच्चा व अनिरुद्ध चांद्रसेखर या जोडीने राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एआयटीएचे सहसचिव सुमन कपूर, भारताच्या डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक झीशान अली आणि भारताच्या फेड कप संघाचा कर्णधार विशाल उप्पल यांच्या हस्ते करण्यात आले.  स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: एकेरी: उपांत्य फेरी: अर्जुन कढे वि.वि.इशाक इकबाल 6-2, 2-6, 6-2; पृथ्वी शेखर वि.वि.नितीन कुमार सिन्हा 7-6(7), 2-6, 7-5.अंतिम फेरी: अर्जुन कढे(महाराष्ट्र)वि.वि.पृथ्वी शेखर(रेल्वे) 6-3, 6-4
महिला गट: उपांत्य फेरी:वैदेही चौधरी वि.वि.आरती मुनियन 6-4, 6-4; श्रीवल्ली भामिदिप्ती वि.वि.साई संहिता 4-6, 6-3, 6-2;अंतिम फेरी: श्रीवल्ली भामिदिप्ती(तेलंगणा)वि.वि.वैदेही चौधरी(गुजरात)6-2, 7-6(2); 
दुहेरी गट: अंतिम फेरी: पुरुष:निकी पोनाच्चा/अनिरुद्ध चंद्रशेखर वि.वि.ईशाक इकबाल/नितीन कुमार सिन्हा 4-6, 6-3, [10-5];महिला गट: साई संहिता/रिषिका सुंकारा वि.वि.सोहा सादीक/सौम्या वीज 7-5, 7-6(2).