‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी मराठवाड्यात विशेष उपक्रम

१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय विशेष शिबीरे, प्रशिक्षण, मार्गदर्शन सत्र

छत्रपती संभाजीनगर ,२५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची माहिती देण्यासाठी  बुधवार दि.१ नोव्हेंबर पासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात गुरुवार दि.२ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिबिर होणार आहे.

जिल्हानिहाय विशेष शिबिर

 यासंदर्भात शनिवार दि.२१ रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यातआली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार, मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.

जिल्हानिहाय शिबिरांचे वेळापत्रक याप्रमाणे- बुधवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. बीड, गुरुवार दि.२ नोव्हेंबर  छत्रपती संभाजीनगर व जालना, शुक्रवार दि.३ नोव्हेंबर लातूर,  शनिवार दि.४ नोव्हेंबर धाराशीव, मंगळवार दि.७ नोव्हेंबर परभणी, बुधवार दि.८ नोव्हेंबर  हिंगोली,  गुरुवार दि.९ नोव्हेंबर नांदेड याप्रमाणे. ही सर्व शिबिरे त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येतील.

विविध योजनांची माहिती, प्रशिक्षण व मार्गदर्शन

या शिबिरांमधून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे, लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, योजनेचा प्रचार प्रसार, सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन २०२३- २४ या वर्षांमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी  मराठा अशा एकूण वीस हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम याची मागणी नोंदणीचा फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरणे. सद्य:स्थितीत सुरू असलेले राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठीही अर्ज भरून घेण्यात येतील. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित केले जातील.

प्रत्येक ग्रामपंचायतीत माहिती व तालुकानिहाय मेळावे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत योजनेची माहिती देण्यात येईल.  तालुक्याच्या ठिकाणीही मेळाव्याचे आयोजन करून नोंदणी करण्यात येईल. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देणे, बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही स्टार्ट-अप बिझनेस छोटे उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी संबंधी उद्योग सुरू करण्याकरता आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.

या शिबिरांत जिल्ह्यातील महत्त्वाच्या बँकांचे प्रतिनिधी, विविध व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहतील. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, सारथी व व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे सर्व संबंधित विभागप्रमुख मेळाव्यांस उपस्थित असतील,असे कळविण्यात आले आहे. या शिबिरांचे युवक युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.