भाजपसोबत जाण्यास इच्छुक असलेल्या ठाकरेंना संजय राऊतांची आडकाठी-खासदार सुनील तटकरे

संजय राऊत तुम्ही आरोपी आहात : सुनील तटकरे

मुंबई,१३ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- भाजपवर सतत टीका करणारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांची एकांतात चर्चा झाली आणि उद्धव ठाकरेंचे मन विचलित झाले, त्यांना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. शिवाय ही गोष्ट स्वतः संजय राऊतांनी अजितदादांसोबत झालेल्या बैठकीत सांगितली आणि त्या बैठकीला एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटलं.

सुनील तटकरे म्हणाले की, कोविड काळात संजय राऊतांना अजितदादांची भेट हवी होती. उद्धव ठाकरेंनी वेगळे वाटून घेऊ नये. महाराष्ट्रातील काही प्रश्नांसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी २०२१ मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ती भेट घेतल्यानंतर सतत ४-५ दिवस संजय राऊतांचा माझ्याकडे आग्रह होता. अजित पवारांची भेट घेऊन काही चर्चा करायची होती. एकदा भेटीची वेळ ठरली परंतु काही कारणास्तव दादांना तिथे पोहचता आले नाही. अजितदादा न आल्याने संजय राऊतांना वाईट वाटले होते. काही रागही आला होता. पण त्यानंतर २ दिवसांनी पुन्हा अजित पवार, संजय राऊत आम्ही एकत्र बसलो होतो. त्यात एकनाथ शिंदे, उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, या बैठकीत संजय राऊतांकडून असं कळलं की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मन विचलित झाले आहे. आपण पुन्हा भाजपासोबत जावं असं उद्धव ठाकरेंना वाटतंय. त्याबाबत पुष्टी एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरांना करायला लावली. तास दीड तास सखोलपणे चर्चा केली. उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. त्याची कारणे काय हे उद्धव ठाकरे सांगतील. संजय राऊत त्यावर प्रकाश टाकू शकतात असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय शरद पवार आजारी असताना वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटायलाही आले नव्हते. ३-४ महिने शरद पवारांशी संवाद बंद होता. याबाबत तीव्र नाराजी संजय राऊतांनी माझ्याकडे व्यक्त केली होती, असं तटकरे म्हणाले आहेत.

संजय राऊत, टीका करताना सभ्य भाषेत टीका करा

संजय राऊत उद्धव ठाकरेंना खासगीत अरेतुरे करतात, कदाचित त्यांचे नाते तसे असू शकते. तो त्यांचा अधिकार आहे. ते दीर्घकाळ एकत्रित आहेत. मी त्यावर बोलणार नाही. आपल्या पक्षात काय घडलंय त्याबाबतचा विचार मांडायचा अधिकार तुम्हाला आहे. आमच्या भूमिकेवर पत्रकार म्हणून तुम्हाला लिखाण करण्याचा अधिकार आहे. परंतु लिखाणात सुसंस्कृतपणा असावा. कालपर्यंत अजितदादांसारखे नेतृत्व असू शकत नाही असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी अशाप्रकारे टीका करणे योग्य नाही. यापेक्षाही अधिक तुम्ही बोललेला आहात हे लक्षात ठेवा. टीका करताना सभ्य भाषेत टीका करा. पातळी सोडून बोलू नका असा इशाराही सुनील तटकरेंनी संजय राऊतांना दिला आहे.

संजय राऊत तुम्ही आरोपी आहात

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनवलं तेव्हा आणि त्यानंतर सातत्याने अजित पवार उत्तमप्रकारे काम करत होते. अजितदादांशिवाय महाविकास आघाडीचं सरकार चालू शकत नाही असं संजय राऊत बोलायचे. अनेकदा माझ्याशी संपर्क साधायचे. दादांच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या प्रशासन कौशल्यामुळे कोविड काळात सरकार अतिशय उत्तम चालले असं म्हणायचे. आता सिंचन घोटाळ्यावरून संजय राऊत आरोप करतायेत. परंतु कुठल्याही तपास यंत्रणेत मी किंवा अजितदादा दोषी आढळलो नाही. कधीही आरोपी केले नाहीत. संजय राऊत तुम्ही आरोपी आहात. तुम्ही अटकेत होता, जामिनावर बाहेर आला आहात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांवर बोलायचा नैतिक अधिकार नाही असा टोलाही तटकरेंनी संजय राऊतांना लगावला आहे.