जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ‘‘मुदतीत भूमिका घ्या “

छत्रपती संभाजीनगर,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी मुदतीत निर्णय घेतला नाही तर, आम्ही वेगळी भूमिका घेणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ऐतिहासिक उपोषणानंतर सध्या मराठा आरक्षण जनजागृती मोहिमेसाठी निघालेले जरांगे यांनी आज, मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात मनोज जरांगे यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.त्यांनी सरकारला सुनावले. ४० दिवस सरकारला त्रास देणार नाही, असे सांगून जर सरकारने भूमिका घेतलीच नाही तर मग वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीच, असा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. विदर्भात प्रामुख्याने ओबीसी समाज असला तरी येथील मराठा आमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही जण ओबीसी व मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाही.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. जे सरकारशी चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आलं. मात्र मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं त्यांचं आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं नाही. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक सवाल केला आहे. आंतरवली सराटी गावात आमच्यावर हल्ला का झाला? हा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांनी विचारला असून या प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ शकलेलं नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा आरक्षणाची लढाई ही अनेक वर्षांपासून सुरु आहे. २९ ऑगस्टला आम्ही पु्न्हा एकदा हा लढा देण्यास सुरुवात केली. आपल्याला आरक्षण नको पण आपल्या नातवाला आरक्षण कामी येईल या भावनेतून अनेक महिलाही आरक्षणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. मात्र आमच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. तो का करण्यात आला? याचं उत्तर अद्यापही सरकार देऊ शकलेलं नाही.

चार महिन्यांचं बाळ असलेल्या आईचं डोकं फुटलं आणि…

चार महिन्यांचं बाळ असलेल्या आईचं डोकं फुटलं. त्या आईचं रक्त बाळाच्या अंगावर पडलं. काहींचे हात मोडले, पाय मोडले हा सगळा हल्ला आमच्यावर नव्हता. तर तो हल्ला संपूर्ण मराठा समाजावर करण्यात आला. आमचं असं काय चुकलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला केला? शांततेत चाललेल्या आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज का करण्यात आला? असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्यांना मी सोडणार नाही तो कुणीही असो मी मराठ्याची अवलाद आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात म्हटलं आहे.

आमची चूक तरी काय?

२९ ऑगस्टला जे आंदोलन सुरु केलं त्या आधीच आम्ही इशारा दिला होता. मला खुर्चीचा मोह नव्हता, मी व्यासपीठावर गेलो नव्हतो. मी शांत बसा म्हटलो तरी लोक शांत बसत होते. जालन्याचे कलेक्टर आणि एसपी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की असा मॉब शांत करणारा माणूस बघितला नाही. जर इतकं सगळं होतं तर मग आम्ही नंतर कसा काय धिंगाणा केला? मराठ्यांची अवलाद कधीही धिंगाणा करू शकत नाही पण सरकारने कधीच खुलासा केला नाही. आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या अशी मागणी केली तर चुकले काय ? आम्ही शांततेत आंदोलन केले ही आमची चूक होती का? १९२३ पासून मराठा आरक्षण आहे हे मागितले ही आमची चूक होती का? असेही प्रश्न आपल्या भाषणात मनोज जरांगेंनी विचारले आहेत.

१२३ गावांमधून लोकवर्गणी; अंतरवाली सराटीत तयारीला वेग

जालना: अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली असून सभे साठी मैदान व व्यासपीठ उभारणीच्या तयारीला आता वेग आला आहे. मराठा आरक्षणाविषयी च्या मागणीसाठी आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी मनोज जरंगे येणाऱ्या १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातल्या अंतरवाली सराटीत विराट सभा घेणार आहेत. या विराट सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा तयार करण्यात येत आहे. सभेसाठी नियोजित स्थळाची साफसफाई करण्यात येत असून व्यासपीठ उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.

१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित भव्य सभेसाठी होणारा खर्च गोदाकाठची १२३ गावातील समाजबांधव लोकवर्गणी जमा करुन करणार आहेत. यासाठी विद्युत व्यवस्था, साउंड सिस्टिम,मंडप,पाणी व्यासपीठ,पार्किंग व्यवस्था, आसन व्यवस्थासह अनेक व्यवस्था व यासाठी मोठा खर्च होणार आहे आणि हा सर्व खर्च फक्त १२३ गावातील समाज बांधवांच्या आर्थिक वर्गणीतून होणार आहे.या कामासाठी ५ जणांचे निधी संकलन मंडळ निवडण्यात आले आहे. यात सुदामराव मुकणे, किशोर मरकड, ज्ञानेश्वर उढाण,सचिन मोटे, भाऊसाहेब नाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. निधी संकलनासंबधी आचारसंहिता व नियमावली ठरविण्यात आली असून फक्त १२३ गावातूनच निधी घेतला स्वीकारला जाणार आहे.निधी संकलन मंडळातील समावेश असलेल्या वरील ५ सदस्यांकडेच आपल्या गावातला निधी जमा करण्याचे ठरले असून याव्यतिरिक्त कुणीही, कुणाकडेही पैसे जमा करू नयेत,अथवा देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.१२३ गावाला दिलेला हा सम्मान समजून या महान कार्यात महत्वाचे योगदानाची जबाबदारी सर्व गावांनी स्वतः हून घेतली आहे.

या सभेसाठी कित्येक गावे पुढे सरसावली असून सभेच्या दिवशी येणाऱ्यांसाठी पुऱ्या, दशम्या,शेंगदाण्याची चटणी,ठेचा करण्याची तयारी गावागावात चालू आहे. पिण्यासाठी शुद्ध पिण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय येणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीची जबाबदारी काहींनी घेतली असून गाड्यांचे पंक्चर,हवा भरणे,गाड्यांची किरकोळ दुरुस्ती विनामूल्य करून देण्यासाठी परिसरातील मेकॅनिक पुढाकार घेत आहेत.त्यामुळे सर्वार्थाने ही सभा खूपच गाजणार आहे.