नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई,११ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी-सेवा उपलब्ध करून देतात.  परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत. या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठित करावी, असे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत गठित समितीने अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सहकार मंत्री श्री.वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.