वारकऱ्यांना सुरक्षा,स्वच्छता आणि सेवा द्या- पालकमंत्री संदिपान भुमरे

नाथषष्ठी यात्रा महोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक

छत्रपती संभाजीनगर,६ मार्च / प्रतिनिधी :-नाथषष्ठी यात्रा महोत्सवाचे यंदा ४२५ वे वर्ष आहे. यानिमित्ताने पैठण येथे मंदिरावर सजावट, रोषणाई करतांनाच येणारे भाविक व वारकऱ्यांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्यावी,असे निर्देश राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.

       नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या पुर्वतयारीसाठीची आढावा बैठक आज पैठण येथील नाथमंदिरात घेण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी (महसूल) नीलम बाफना, मुख्याधिकारी संतोष आगळे, डिवायएसपी विश्वंभर भोर,पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे  सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर, गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडित किल्लारीकर, एसटी आगारप्रमुख गजानन मडके, नाथवंशज हरिपंडीत गोसावी तसेच विविध प्रशासकीय विभाग प्रमुख व विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. दि. ३१ मार्च, १ व २ एप्रिल या दरम्यान षष्ठी, सप्तमी व अष्टमी असे ३ दिवसीय धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यंदाचे ४२५ वे वर्ष आहे. यात्रा मैदानावरील सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच जंतुनाशक फवारणी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सक्षम करण्याची कामे हाती घेतली आहेत,अशी माहिती आगळे यांनी दिली.

        या बैठकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले की, यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा देण्यात याव्या. यंदा प्रथमच शहर व नाथषष्ठी यात्रा मैदानावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या वारकऱ्यांना शांतता व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व रोगराई नियंत्रणासाठी स्वच्छता यासारख्या सेवा देण्यात याव्या, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या. संचालन अरुण काळे यांनी केले.