मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठांना ‘सक्षम’चे सहाय्य

छत्रपती संभाजीनगर,६ मार्च / प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोग विविध तंत्रस्नेही उपाययोजना मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी करीत आहे. आयोगाने तयार केलेले ‘सक्षम’ नावाचे मोबाईल ॲप दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्ति (८५ वर्षे व त्यापेक्षा अधिक) मतदान करण्यासाठी सहाय्य करणार आहे.

२६५३२ दिव्यांग तर ४५०५३ वयोवृद्ध मतदार

जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदार संघ आहेत.  त्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघास जोडलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर व वैजापूर हे विधानसभा मतदार संघ औरंगाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १६ हजार ६० पुरुष तर १० हजार ४६० महिला व १२ इतर असे एकूण २६५३२  दिव्यांग मतदार आहेत. जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघांतील दिव्यांग मतदार संख्या ९५३२  तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदार संख्या १७ हजार आहे.

 त्याचप्रमाणे वय वर्षे ८५ पेक्षा अधिक असलेले वयोवृद्ध मतदार संख्या जिल्ह्यात १८ हजार १५६ पुरुष, २६ हजार ८९७ महिला अशी एकूण ४५ हजार ५३ इतकी आहे.  त्यात जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघात १६ हजार १२२ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघात २८ हजार ९३१ मतदार वयोवृद्ध आहेत.

‘सक्षम’द्वारे आवश्यक सुविधांसाठी नोंदणी

दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सक्षम ॲप द्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्याची  मागणी नोंदवावयाची आहे.  त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचे मतदारसंघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होऊन आवश्यक मदत जसे वाहतुक व्यवस्था, व्हिल चेअर, सहाय्यक इ. पोहोचविण्याची व्यवस्था करता येईल.

मतदान केंद्रांवरही सुविधा

मतदान केंद्रांवरही दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगांमध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार व्हिल चेअर, सहाय्यक स्वयंसेवक त्यात एनसीसी, स्काऊट- गाईड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांचा समावेश असेल. त्याच प्रमाणे मेडीकल किट, तसेच माहितीचे फलक, मुक बधीरांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधणारे स्वयंसेवक , दृष्य माहिती , ब्रेल लिपीतील सुचना इ. सुविधा करण्याचेही आयोगाचे निर्देश आहेत.  तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाण अधिक असणे, किंवा वृद्धत्वामुळे हालचालींवर मर्यादा असल्यास अशा व्यक्तिंना टपाली मतदानासाठीही उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त हे मूल्यमापन करणार आहेत. तसेच दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांशी साधावयाच्या संवादाबाबत मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही होणार आहे.

१९५० हेल्पलाईन व व्हिडीओ कॉल सुविधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहा. आयुक्त वाबळे हे दिव्यांग व वयोवृद्ध मतदार सुविधेसाठीचे नोडल अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात १९५० हा हेल्पलाईन नंबर स्थापित करण्यात आला असून या क्रमांकावरही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक बधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

  निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ४०० क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी राठोड, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाभरातील ४०० क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की. मतदान प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. मतदान यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हीपॅट या यंत्रांची जोडणी, योग्य तपासणी व हाताळणी योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. ह्यासाठी प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रक्रिया समजून घ्यावी. या दरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणींचे आकलन करुन त्यादूर करुन ऐनवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी अहवाल देण्याची जबाबदारी पार पाडावी. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या केंद्रावर पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सखोल माहिती करुन घ्यावी व आपले काम चोख पणे पार पाडावे. या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.

 उपविभागीय अधिकारी राठोड यांनी सादरीकरण करुन व्हीव्हीपॅट, मतदान यंत्र, कंट्रोल युनिट वापर व हाताळणीबाबत प्रशिक्षण दिले.