एमआयएम उखडून फेका आणि कमळ फुलवा:छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा भाजप लढविणार असल्याचे अमित शाह यांचे संकेत 

कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले ,लाज वाटली पाहिजे 

छत्रपती संभाजीनगर,५ मार्च / प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. शाह यांनी सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला. आज पुन्हा मजलिस येऊन बसले आहेत, ते योग्य आहे का, असा प्रश्न करीत, एमआयएम उखडून फेका आणि कमळ फुलवा, असे आवाहन शहा यांनी केले. ‘जे पक्ष घराणेशाहीने चालतात, ते देशाच्या लोकशाहीसाठी काम करू शकतात का? ‘इंडिया’तील सर्व पक्ष घमंडिया आहेत. परिवारवादी आघाडी आहे. संभाजीनगर नामकरणाला विरोध करणारे, कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले आहेत. ते जनतेसमोर जाणार कसे, असा टोलाही शहा यांनी लगावला.

अमित शाह म्हणाले, मी इथे येण्यापूर्वी संभाजीनगर मागितलं आहे. संपूर्ण देशात या संभाजीनगरचं नाव घेतलं जातं. परंतु, कोणी विचारलं, संभाजीनगरचा खासदार कुठल्या पक्षाचा आहे तर उत्तर येतं, मजलिसचा (असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष) खासदार आहे. मी आज इथे जमलेल्या लोकांना विचारू इच्छितो की, तुम्ही इथून निघताना एक निर्धार करून जाल का? छत्रपती संभाजीनगरातून मजलिसला उखाडून फेकण्याचा निर्धार करणार का? मजलिसला हटवून पंतप्रधान मोदी यांना संभाजीनगरमधून एक कमळ पाठवणार का? मोदी यांना ४०० पार नेणार का? मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार का?

अमित शाह जनसभेला संबोधित करताना म्हणाले, आपल्याला काही लोकांना आता घरी बसवावं लागेल, तशी वेळ आली आहे. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला निजामापासून मुक्त केलं होतं. आता या नव्या निजामांना घरी बसवायची आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. यावेळी आम्हाला महाराष्ट्रातून ४० ते ४१ जागा नकोत तर ४५ पेक्षा जास्त मोदींसाठी द्या.

आम्ही दहा वर्षात उत्तम काम केलं आहे, आमच्याकडे त्याचा हिशेब आहे. तसंच आमच्याकडे पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप आहे असंही अमित शाह छत्रपती संभाजी नगर येथील भाषणात म्हणाले. मी या मंचावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, इंडि आघाडीचं नेतृत्व तुम्ही करत आहात, २००४ ते २०१४ सोनिया गांधींच्या नेतृत्वातलं मनमोहन सरकार होतं. तेव्हा महाराष्ट्राला किती निधी मिळाला? १ लाख ९१ हजार कोटी. मात्र मोदी सरकारच्या मागच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात चौपट निधी म्हणजेच ७ लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला. १६ लाख कोटी मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठवले. मला शरद पवारांना विचारायचं तर हिशेब घेऊन या, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलंत?

१ कोटी २० लाख लोकांना महाराष्ट्रात प्यायचं पाणी घरात मिळालं. ७६ लाख कुटुंबांना घरात शौचालय मिळालं. ५१ लाख लाभार्थ्यांना घरात गॅस मिळाला. १२ लाख लाभार्थ्यांना घरं मिळाली हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. विविध प्रकारच्या सुविधा मागच्या दहा वर्षांत दिल्या आहेत.

माझं इंडि आघाडीला आव्हान आहे.. तुमची दहा वर्षे आणि आमची दहा वर्षे करा हिशेब. बघा कुणाचं पारडं जड आहे? मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा सफाया केला. कलम ३७० हटवणं हा योग्य निर्णय घेतला. ७० वर्षे कलम ३७० अनौरस मुलाप्रमाणे काँग्रेसने कुरवाळलं होतं. मात्र मोदी २.० च्या काळात त्यांनी हे कलम ३७० हटवलं. मला राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते कलम ३७० हटवलं तर रक्ताचे पाट वाहतील. पण पाच वर्षात कुणाला दगड उचलण्याचीही हिंमत झालेली नाही. असंही अमित शाह म्हणाले.

फडणवीसांकडून जलील टार्गेट

संभाजीनगरच्या खासदाराने कलम ३७० चं समर्थन केलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थ दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं का? असे सवाल विचारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार इम्तियाज जलील यांना टार्गेट केलं. त्याचवेळी यंदाच्या निवडणुकीत गतवर्षीची चूक सुधारण्याची वेळ आल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, “या नगरीला छत्रपती संभाजीनगर नाव द्यायला हवे असे पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने सत्तेत असलेल्या अडीच वर्षात त्यांचे पुत्र नाव देऊ शकले नाही. सरकार जाताना त्यांना जाग आली. आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरीचे नाव छत्रपती संभाजीनगर केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाव झालं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं”

संभाजीनगरचे खासदाराने ३७० कलम हटविताना हात वर केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं का? मात्र जे ३७० ला विरोध करत होते, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. यावेळी संभाजीनगरच्या मतदारांनी चूक करू नये. छत्रपती संभाजी नगरचा खासदार हा मोदींच्या विचाराचा असला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.