ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पातील भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवा-रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे 

पालकमंत्र्यांनी घेतला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै /प्रतिनिधी :-पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यस्थिती इ. विषयांचा समावेश होता.

या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्य अभियंता गवळी, कार्यकारी अभियंता येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मिरासे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अशोक शिरसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे प्रमोद सुरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. प्रकाश मुंडे आदी उपस्थित होते.

भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवा

ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया रहाट गाव व सोलनापूर येथे अपुर्ण आहे. याठिकाणी मोजणी, कृषी मूल्यांकन प्राप्त करणे,  पुनर्मुल्यांकन करणे इ. कामांबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना मोबदला प्रदान करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच सुखना प्रकल्प व संत ज्ञानेश्वर उद्यानाचे काम या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा. सुखना प्रकल्पा संदर्भात पुनर्वसन प्रस्ताव पाठवावा. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून प्राप्त  निधीतून कामे पूर्ण करुन उद्यानाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, असे निर्देश श्री. भुमरे यांनी दिले.

‘खेलो इंडिया’ अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या कामांचे योग्य नियोजन करा

जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकूलात फुटबॉल, हॉकी सहित विविध खेळांची क्रीडांगणे तयार करण्याचे काम गतिने करावे. तसेच जिल्ह्यात खेलो इंडिया  अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या कामांचे योग्य नियोजन करावे. यावेळी युथ होस्टेल इमारतीचे काम, पैठण क्रीडांगण, जिल्हा क्रीडा संकूल इ. कामांचाही त्यांनी आढावा घेतला.

‘साबांवि’च्या कामांचा आढावा

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रशासनाच्या सोईच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसह अन्य नवीन इमारती प्रस्तावित आहेत. त्या कामांच्या प्रगतीचा आढावा श्री. भुमरे यांनी घेतला. कन्नड, सिल्लोड येथे होत असलेल्या शासकीय इमारतींच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला.

या बैठकीत उद्योगांनी खर्च करावयाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षण, आरोग्य सुविधांची कामे हाती घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री भुमरे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,औद्योगिक वसाहतींचे प्रश्न,जिल्हा परिषदेकडील विषय, शालेय पोषण आहार, घरकुल इ. विविध विषयांचा आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला.