आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा- पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै /प्रतिनिधी :-आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून पोलीस व सहकार विभाग यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. तथापि, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी राबवावयाच्या प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.

 येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात उपाययोजनांची माहिती आज पालकमंत्री श्री.भुमरे यांनी घेतली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते. सहा. आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी सांगितले की, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून  केलेल्या कारवाईची माहिती परस्परांना द्यावी. तसेच होत असलेल्या वसुलीची व ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेची ठेविदारांनाही वेळोवेळी माहिती द्यावी.

बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली, संचालकांवर निश्चित करावयाची जबाबदारी इ. बाबत माहिती दिली.

कर्ज वितरणात झालेल्या अनियमिततेबाबत सहकार आयुक्तांच्यास्तरावरुन समिती नेमून चौकशी व्हावी, अशी सुचनाही त्यांनी केली. संस्थेच्या तसेच संचालकांच्या मालमत्तांची, संदिग्ध व्यक्ती व मालमत्तांची  माहितीही नोंदणी कार्यालयाकडे द्यावी. जेणेकरुन अशा मालमत्तांचे व्यवहार होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.