महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडल:ग्राहकाभिमुख अभिनव उपक्रमांनी गाजले वर्ष

मागोवा २०२३

ज्ञानेश्वर आर्दड

वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे. सरत्या वर्षात छत्रपती संभाजीनगर परिमंडलातही मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांमुळे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली. ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ या उक्तीप्रमाणे डॉ.केळे यांनी स्वतः फिल्डवर उतरून परिमंडलातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र, यंत्रचालक यांच्या साथीने अनेक चांगले उपक्रम राबविले. 
नवीन वीजजोडणी, तक्रारींचा निपटाऱ्यास वेग
शासनाच्या ‘इझ ऑफ लिव्हिंग‍’ संकल्पनेनुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीजपुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात राज्यात आघाडी घेतली. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीजजोडणी देणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी, बिलिंगच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढणे तसेच वितरण रोहित्र वेळेत बदलणे या पाच मुद्द्यांवर काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मिशन मोडवर काम करत वीजजोडण्या तत्परतेने देण्यासह तक्रारींचा निपटारा करण्यात आला. परिमंडलात सर्व तक्रारींचे प्रलंबन अवघ्या एका दिवसावर आले आहे. महावितरणमधील इतर परिमंडलांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात कमी आहे. वीजपुरवठा बंदच्या तक्रारींचे निवारण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तत्परतेने बदलण्यातही परिमंडलाने आघाडी घेतली आहे.
रोहित्र नादुरुस्तीच्या प्रमाणात लक्षणीय घट
मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या पुढाकारातून रोहित्रांचा प्रणालीत समावेश, वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम व नियमित देखभाल-दुरुस्ती या त्रिसूत्रीद्वारे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी झाले आहे.‍ डॉ. केळे यांनी मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत रोहित्र नादुरुस्तीची गांभीर्याने ‍दखल घेतली. अनेक ठिकाणी बसवलेल्या सुमारे ८ हजार रोहित्रांची नोंद महावितरणच्या प्रणालीत करताच रोहित्र नादुरुस्तीचे पूर्वीच्या संख्येनुसार असलेले प्रमाणही आपोआप घटले.
वीजचोरांवर धडक कारवाई
वीजचोरीमुळे ‍रोहित्रावर भार येऊन ते नादुरुस्त होते. त्याबरोबरच महावितरणचे आर्थिक नुकसानही होते. त्यासाठी मुख्य अभियंता डॉ.केळे यांच्या निर्देशाने प्रत्येक महिन्यातील किमान तीन दिवस केवळ वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली.  ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीजचोरीविरोधातील धडक मोहीम राबवण्यात येते.  गेल्या सहा महिन्यात ८ हजार जणांवर कारवाई करत ९ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात यश मिळाले. ‍तसेच तब्बल १२२६ जणांवर थेट पोलिसांत गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. नियमित कारवाईमुळे महावितरण्याच्या महसूलवाढीमुळे रोहित्रे सुस्थितीत राहण्यासही मदत होत आहे.   

बिडकीन उपकेंद्राला आयएसओ नामांकन

बिडकीन येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राला राज्यात दुसरे तथा मराठवाड्यातील  पहिले आयएसओ मानांकन मिळाले. यासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता डॉ.केळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. परिमंडलातील उर्वरित उपकेंद्रे व महत्त्वाच्या आस्थापनांनीही ‍बिडकीन उपकेंद्राचा आदर्श घेत आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आणि वीजग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा द्यावी, असे आवाहन डॉ.केळे यांनी यावेळी केले.     

कृषी ग्राहकांना वीजजोडणी प्रमाणपत्रे
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘शासन आपल्या दारी’ अभियान कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राबवण्यात आले. या अभियानात कन्नड तालुक्यातील २८ कृषी ग्राहकांना प्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वीजजोडणी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.    

वितरण पेट्यांचे ३ हजार दरवाजे केले बंद

कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे

विद्युत यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी डीपीवरील वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे बंद करण्याची मोहीम परिमंडलात ८ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. एकूण ३२८३ उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद करण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी स्वतः पाहणी करीत शहरातील अनेक उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद केले. विद्युत सुरक्षेसाठी वितरण पेट्यांचे दरवाजे मोहीम त्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली. विविध कारणांनी अनेकदा डीपीवरील वितरण पेट्यांचे दरवाजे उघडे व तुटलेले दिसतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना म्हणून सर्व उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे स्वयंस्फूर्तीने एकाचवेळी बंद आले. परिमंडलातील सर्व अभियंते व जनमित्रांनी ही मोहीम यशस्वी केली. वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे व नंतर ते बंद केल्याची छायाचित्रे घेऊन परिमंडल कार्यालयास अहवाल  पाठविण्यात आला. 

५ हजारांहून अधिक रोहित्रे, विद्युत खांब वेलीमुक्त
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी रोहित्रे तसेच खांबांवरील वेली व झुडपे काढण्यासह उपकेंद्रांतही स्वच्छता करण्याची मोहीम परिमंडलात १० ऑक्टोबर रोजी राबविण्यात आली. एकूण ५१०० ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी विविध ‍ठिकाणी स्वतः पाहणी करीत मोहिमेत सहभाग घेतला. पावसाळ्यात रोहित्रे, विद्युत खांबावर वेली व झाडेझुडपे वाढलेली होती. पावसाळा संपताच दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि सुरक्षा उपाययोजना म्हणून परिमंडलात एकाचवेळी विद्युत खांब व रोहित्रांवरील वेली व झुडपे काढण्याची मोहीम स्वयंस्फूर्तीने वेळेत राबविण्यात आली.     

‘प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे’ विशेषांकाचे प्रकाशन
ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अभियंता, साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांच्या व्यक्तिमत्त्वावरील डॉ. शिवाजी तिकांडे व दत्ता किवने यांनी संपादित केलेल्या ‘प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे’ या विशेषांकाचे प्रकाशन एमजीएम विद्यापीठात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. मुरहरी केळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून महावितरणमध्ये कर्तव्य पार पाडत असतानाच साहित्य, चित्रपट, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत ते उल्लेखनीय कार्य करत आहेत. आज सामाजिक, नैतिक चारित्र्य संपत चाललेले असताना एका अधिकाऱ्याला मानणारा व त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा कर्मचारीवर्ग आहे. म्हणूनच डॉ.केळे हे कर्मचाऱ्यांसाठी एका दिव्याप्रमाणे पथदर्शी, ऊर्जावान व्यक्तिमत्त्व ठरले आहेत, असे गौरवोद्गार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी या समारंभात काढले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे उपस्थित होते.  

संघटना व प्रशासन सुसंवाद बैठक
ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीजपुरवठा व विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे. कंपनीसमोर वीजबिल वसुलीसह अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी कर्मचारी संघटना व प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास महावितरण आणखी प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले. परिमंडलातील विविध कामगार व कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी डॉ.केळे यांनी थेट संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. ग्राहकसेवा, महसूलवाढ, अखंडित वीजपुरवठा, विद्युत सुरक्षा, वीज बचत, वीजचोरी व वीजगळती रोखणे, ऑनलाईन सेवांबाबत विविध संघटनांच्या केंद्रीय व परिमंडल स्तरावरील पदा‍धिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून प्रशासन त्यांचा सकारात्मक विचार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी नाशिक परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचे ‘तणावमुक्ती व दैनंदिन कामकाज’ यावर विशेष व्याख्यान झाले.  

 वर्धापनदिन सोहळ्याने मिळाली नवी ऊर्जा
कथाकथन, एकपात्री नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी खेळ अशा भरगच्च कार्यक्रमांनी महावितरणचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली. यावेळी मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी मार्गदर्शन केले. विद्युत क्षेत्रातील बदलत्या धोरणामुळे खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्षम व्हावे लागेल. कंपनीला १८ वर्ष पूर्ण झाली असून आता आपण प्रौढ झालो आहोत, त्यानुसार आपले वागणे आणखी जास्त जबाबदारीचे असणे अपेक्षित आहे. डॉ.केळे यांनी संत तुकारामांच्या अभंगातील दाखले देत विजेचा नि:पक्षपातीपणा आणि विजेच्या बचतीचे बचतीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रा.रवींद्र कोकरे यांच्या खुमासदार शैलीतील कथाकथनाने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. संदीप पाचंगे यांच्या ‘चुकीला माफी नाही’ या एकपात्री प्रयोगाने विद्युत सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. दिलीप खंडेराय व संचाने सादर केलेल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.      

पथनाट्य, रॅलीद्वारे योजनांचा जागर

वर्धापनदिनानिमित्त मुख्य ‍अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडल कार्यालय ते सूतगिरणी उपकेंद्र अशी मोटारसायकल रॅली व महावितरणच्या सेवा, वीजबिल नियमित व ऑनलाईन भरण्याचे आवाहन, ऊर्जा बचत, वीजचोरीचे दुष्परिणाम, बनावट मेसेजपासून सावधान आदी विषयांची माहिती देणारा चित्ररथ काढून जनजागृती करण्यात आली. मध्यवर्ती बस स्थानक, पैठणगेट, शहानूरमिया दर्गा ‍परिसर व पुंडलिकनगर रोड व सूतगिरणी उपकेंद्र ‍परिसरात कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. महावितरणच्या सेवा, वीजबिल नियमित व ऑनलाईन भरण्याचे आवाहन, ऊर्जा बचत, विद्युत सुरक्षा, वीजचोरीचे दुष्परिणाम, बनावट मेसेजपासून सावधान आदी विषयांवर पथनाट्यातून प्रबोधन सादर करण्यात आले.    

खासगी गटातील उद्योजकांना सुरळीत वीज
वाळूज एमआयडीसीलगतच्या खासगी गट नंबरमधील उद्योगांना दर्जेदार, सुरळीत वीजपुरवठा करण्याची उद्योजकांची अनेक दिवसांची आग्रही मागणी होती. यावर महावितरणने उपाययोजना करत नवीन ३३ किव्हो ‍वाहिनी टाकल्यामुळे या भागातील उद्योजकांना अखंडित, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळत आहे. ३ जुलै रोजी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे, ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन ३३ किव्हो वाहिनी कार्यान्वित करण्यात आली. वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आणि तत्पर कार्यवाहीबद्दल महावितरणचे आभार मानले. 
कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप 

कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धेत उत्तेजनार्थसह वैयक्तिक गायनात प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या तसेच विविध उपक्रमांत ‍भाग घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रीय भाग आणि ‘गो-ग्रीन’ योजनेत मोठ्या संख्येने वीज ग्राहकांची नोंदणी करणारे कर्मचाऱ्यांचाही डॉ.केळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिमंडलात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘क्वालिटी सर्कल’च्या माध्यमातून उपक्रमशील कर्मचाऱ्यांच्या नवनवीन संकल्पनांचा उपयोग ग्राहक सुविधा, दैनंदिन कामकाज अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी केला जाईल, असे डॉ.केळे यावेळी म्हणाले. 

     अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची आढावा बैठक 

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या तिन्ही परिमंडलाच्या संयुक्त आढावा बैठकीला मार्गदर्शन केले. वीज ही मूलभूत गरज असल्याने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करा. याबरोबरच थकित वीजबिल वसुलीसही प्राधान्य द्या, असे निर्देश त्यांनी दिले. पायाभूत सुविधांची गरज नसलेल्या भागात २४ ते ४८ तासात नवीन वीज जोडणी देण्यावर भर देतानाच विश्वसनीय आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी आपण सर्वांनी तत्‍पर असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. यावेळी संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे, भुजंग खंदारे आदी उपस्थित होते.    

डॉ.केळे यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटकाचा बहुमान

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नागपूर येथे झालेल्या ३० व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांना मिळाला. नवोदितांनी चाकोरीबाहेरचे आणि फक्त नवीन तंत्रज्ञानाचे विषय हाताळावेत, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ.केळे यांनी केले. विद्युत क्षेत्रात काम करत असल्याने त्यांनी ‘मराठी साहित्यातील विजेचे चित्रण‘ यावर भाष्य करताना कवी कालिदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सुरेश भट, कवी ग्रेस, विठ्ठल वाघ, लोकनाथ यशवंत व बाबाराव मुसळे यांचे अनेक दाखले यांनी दिले. आपल्या भोवतालचे जग अतिशय वेगाने बदलत असल्यामुळे त्याची नोंद घेऊन साहित्यिकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लोन, रोबोट विषयही हाताळण्याचे आवाहन नवोदितांना केले.      भारतमाता ज्ञानपीठातर्फे सांगली‍ जिल्ह्यातील विटा येथे झालेल्या ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते झाले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे संमेलनाचे अध्यक्ष होते.    

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची बैठक
ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी महापारेषण व महावितरणच्या विविध योजनांच्या ६ ऑक्टोबर रोजी परिमंडल कार्यालयात  झालेल्या आढावा बैठकीत दिली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात २० ऑक्टोबर रोजी झालेल्या समन्वय बैठकीत महावितरणच्या विविध कामांसाठी संबंधित सर्व शासकीय विभागांनी आवश्यक त्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश दिले.  उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकांना महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे उपस्थित होते.    

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची संवाद मोहीम
लोकप्रतिनिधींच्या वीजविषयक समस्यांच्या निराकरणासाठी, त्यांना वीज क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे संचालक विश्वास पाठक यांनी वर्षाच्या अखेरीस महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांतील अधिकाऱ्यांच्या छत्रपती संभाजीनगर व जालना येथे जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका घेत विविध विषयांवर संवाद साधला. तसेच एप्रिल महिन्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ची माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. 
गांधेली उपकेंद्राचा विद्युत निरीक्षकांकडून गौरव
विद्युत सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३३ केव्ही गांधेली उपकेंद्राचा विद्युत निरीक्षण विभागाने प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. विद्युत निरीक्षक कार्यालयाने उपकेंद्राचे ‍निरीक्षण केले असता विद्युत अधिनियम-२००३ व केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युतपुरवठ्यासंबंधीचे उपाय) विनियम-२०२३ मधील तरतुदीचे पालन झाल्याचे तसेच उपकेंद्रातील विद्युत संच मांडणी सुस्थितीत व सुरक्षित असल्याचे तसेच विविध नोंदवह्या अद्ययावत असल्याचे आढळले. महावितरणकडून उपकेंद्रात उल्लेखनीय काम झाले असून, शासनाचे शून्य अपघात धोरण आपण अंगीकृत केले असल्याचे ‍निरीक्षण नोंदवण्यात आले.   

ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त प्रबोधन
    २० डिसेंबर रोजी परिमंडल कार्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासह इंधनाचे साठे नजीकच्या भविष्यात संपतील. त्यामुळे ऊर्जासंवर्धन हे दैनंदिन जीवनाचे तत्त्व व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा संवर्धनासाठी कायदे असले तरी सर्वांनीच स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करायला हवे. विद्यार्थ्यांचे प्रबोधन केल्यास हे उद्याचे नागरिक ऊर्जा संवर्धनाबाबत सजग राहतील. तसेच विजेचा वापर आवश्यक तेवढाच करायला हवा.‍ विजेबरोबरच इंधन बचतीवरही सर्वांनी भर द्यायला हवा, असेही डॉ.केळे म्हणाले.    

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद छत्रपती संभाजीनगर परिमंडलास मिळाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलांचे ८ संयुक्त संघ सहभागी होणार आहेत. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची जोरात तयारी सुरू असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.        


(लेखक महावितरण छत्रपती संभाजीनगरचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)